बायोमेट्रिकशिवाय आता नवे बँक खाते नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:07 PM2018-10-05T12:07:21+5:302018-10-05T12:09:24+5:30
देशभरातील नवीन खातेदारांना बँक खाते उघडण्यासाठी बायोमेट्रिकच्या आॅनलाइन प्रक्रियेतून जावे लागत आहे.
- संजय खांडेकर
अकोला : आधार लिंक आवश्यक नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार बायोमेट्रिक आधारशिवाय बँक खाते उघडणे अशक्य आहे, देशभरातील नवीन खातेदारांना बँक खाते उघडण्यासाठी बायोमेट्रिकच्या आॅनलाइन प्रक्रियेतून जावे लागत आहे. यासंदर्भात अद्याप तरी कोणतेही नवे निर्देश नाहीत.
बँक खाते उघडण्यासाठी पूर्वी रेशनकार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड आदी माहिती जोडावी लागत होती. या दस्तऐवजासह फोटो दिले की बँकेचे खाते उघडल्या जात असत; मात्र आता केवळ दस्तऐवजावर बँक खाते उघडता येत नाही. बँक खाते उघडताना ती व्यक्ती प्रत्यक्षात घटनास्थळावर असणे गरजेचे आहे. तर त्या व्यक्तीची बायोमेट्रिक फिंगरप्रिंटद्वारे आधार लिंक जुळून आली पाहिजे. जर तसे झाले नाही तर बँक खाते उघडणे अशक्य आहे. त्यामुळे देशभरातील बँकांमधील नवीन खाते आता विना बायोमेट्रिकशिवाय अस्तित्वातच येणार नाही, अशी यंत्रणा करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पाहता ही बाब चांगली आहे; मात्र अद्ययावत तंत्रज्ञानाच्या विश्वात त्याचे वाईट परिणामही भविष्यात समोर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
व्यक्तिगत माहिती पडताळणीसाठी आॅनलाइन बायोमेट्रिक यंत्रणा गरजेची आहे. जुन्या बँक खात्यांसाठी ई-केवायसी आणि नवीन बँक खात्यांसाठी बायोमेट्रिक नोंद अत्यावश्यक आहे. त्याशिवाय नवीन खाते उघडले जाऊच शकत नाही. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे तसे निर्देश आहेत.
- आलोक तेहेनीजा, लिड बँक मॅनेजर,अकोला.