परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रातराणी बस नाहीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:18 AM2021-08-01T04:18:29+5:302021-08-01T04:18:29+5:30
अकोला : राज्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर एसटी महामंडळाची प्रवासी सेवा सुरू झाली आहे. यामध्ये राज्यांतर्गत रातराणी सुरू झाल्या असल्या ...
अकोला : राज्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर एसटी महामंडळाची प्रवासी सेवा सुरू झाली आहे. यामध्ये राज्यांतर्गत रातराणी सुरू झाल्या असल्या तरी परराज्यात जाणाऱ्या रातराणी बस बंद आहेत. मात्र, अकोला आगार क्रमांक २ मधून परराज्यात जाण्यासाठी एकही बस नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, शासनाने ७ जूनपासून सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, एसटीची परराज्यातील रातराणी सेवा बंदच असून, उद्योग-व्यवसायानिमित्त परराज्यात जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या सुरू असलेल्या राज्यांतर्गत रातराणी
नागपूर-पुणे
नागपूर-नाशिक
सध्या सुरू असलेल्या परराज्यातील बस
अकोला-आदिलाबाद
अकोला-निजामाबाद
सीमेवरील गावात सोडले जात असल्याने गैरसोय
जिल्ह्यात परराज्यात जाणारी एकही रातराणी किंवा इतर बससुद्धा सुरू नाही. पूर्वी अकोला आगारातून हैदराबाद, छिंदवाडासाठी बस सुरू होती. आता ही बसही बंद असून, या मार्गावर सीमेपर्यंतचा प्रवाससुद्धा बसगाड्या बदलत करावा लागतो.
- नितीन गवई, प्रवासी
अकोला आगारातून सुटणारी अकोला-इंदूर ही बस आमच्यासाठी सोयीची होती. या बसने आम्ही कधी कधी प्रवास करायचो. आता दोन वर्षांपासून ही बसच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे इंदूरकडे जाण्यासाठी वारंवार बसगाड्या बदलाव्या लागतात.
-रवी दाते, प्रवासी
मध्यप्रदेशातील बस बंदच!
अकोला आगारातून पूर्वी अकोला-हैदराबाद, अकोला-छिंदवाडा, अकोला-इंदूर या परराज्यात जाणाऱ्या बस सुरू होत्या. आता कोरोना पार्श्वभूमीवर ती बंद करण्यात आली आहे. मध्यप्रदेशात जाणाऱ्या सर्व बसवर तेथील शासनाकडून बंद घालण्यात आली आहे. परराज्यात जाणारी एकही रातराणी आगाराकडे नाही. मात्र, राज्यात ज्या बस सुरू आहे, त्यांनाही प्रतिसाद कमी मिळत आहे.