अहवाल येवूनही पॉझिटिव्ह रुग्णांचे ट्रेसिंग नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:17 AM2021-03-22T04:17:29+5:302021-03-22T04:17:29+5:30
जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा संपूर्ण ताण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव व्हीआरडीएल लॅबवर येत आहे. दिवसभरात जवळपास ...
जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा संपूर्ण ताण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव व्हीआरडीएल लॅबवर येत आहे. दिवसभरात जवळपास दोन हजारापेक्षा जास्त स्वॅबची चाचणी करुन त्यांचे अहवाल रात्री १० ते ११ वाजतापर्यंत संबंधित यंत्रणांना कळविण्यात येत असल्याचे व्हीआरडीएल लॅबचे म्हणणे आहे. अहवालाचे रिपोर्टिंग प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, एसडीओ कार्यालय, महापालिका, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासह खासगी रुग्णालयांना केले जाते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी रुग्णांना त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह कळणे अपेक्षीत आहे, परंतु अनेक रुग्णांना दोन दिवसानंतरही त्यांचा अहवाल कळत नसल्याचे चित्र आहे.
वेळेत ट्रेसिंग होत नसल्याने कोविडचा फैलाव
संदिग्ध रुग्णांनी कोविड चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतर तो पॉझिटिव्ह की, निगेटिव्ह हे त्याला चौथ्या ते पाचव्या दिवशी कळते. रुग्णाचे वेळेत ट्रेसिंग होत नसल्याने संबंधित व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येतो. याच माध्यमातून कोरोनाचा संसर्ग एकापासून अनेकांना होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
ताशेरे व्हीआरडीएल लॅबवर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्हीआरडीएल लॅबमध्ये अपुरे मनुष्यबळ आहे. अशा परिस्थितीतही येथे दररोज दोन हजारापेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी केली जाते. शिवाय, २४ तासांमध्ये अहवालाचे रिपोर्टिंग संबंधित विभागाला केले जाते. त्यानंतरही संबंधित यंत्रणांमार्फत पॉझिटिव्ह रुग्णांचे वेळेत ट्रेसिंग होत नाही, मात्र व्हीआरडीएल लॅबकडून अहवाल प्राप्त होत नसल्याचे ताशेरे नागरिकांकडून ओढल्या जात आहेत.
१० केंद्र २० पथकेमहापालिकेच्या हद्दीत प्रत्येक केंद्रात दोन पथके या प्रमाणे दहा केंद्रात २० पथकांच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. एका पथकात दोन जणांचा समावेश आहे. ट्रेसिंगसाठी उपलब्ध मनुष्यबळ कमी आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.