..अन कुटुंबीयांसोबत राहण्याचे स्वप्न राहिले अधुरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:06 AM2017-08-14T02:06:40+5:302017-08-14T02:16:35+5:30
अकोला : लोणाग्रा येथील रहिवासी वीरपुत्र सुमेध गवई यांचा लहान भाऊ शुभम दोन महिन्यांपूर्वीच लष्करात दाखल झाला. त्याला ऑक्टोबर महिन्यात सुटी मिळणार आहे, त्यानंतर संपूर्ण कुटुंबीय ऑक्टोबर महिन्यात भेटून शेगाव येथे जाण्याचे नियोजन करीत असतानाच सुमेधला दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात रविवारी पहाटे वीरमरण आले. अन् कुटुंबीयांसोबत राहण्याचे सुमेधचे स्वप्न स्वप्नच राहिले. सुमेध व त्याच्या सैन्यातील एका मित्राला काही दिवसांची सुटी मिळाली होती; मात्र संपूर्ण कुटुंबीय ऑक्टोबर महिन्यात एकत्र येणार असल्याने सुमेधने येण्याचे रद्द केले आणि त्याचा मित्र १२ ऑगस्ट रोजी सुटी घेऊन घरी पोहोचला, तर सुमेध मातृभूमीच्या सेवेत या भारत मातेच्या कुशीत सामावला.
सचिन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क

सुमेध वामनराव गवई यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण हातरुण येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस होता; मात्र दुसरीकडे देशसेवा करण्याची आवडही त्यांच्या मनात प्रचंड होती.
पदवीच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला; मात्र बीएचे द्वितीय वर्षाला असतानाच दुसर्याच प्रयत्नात ते सागर येथे झालेल्या सैन्य भरती प्रक्रियेत २0११ मध्ये निवड झाली. काही महिन्याअगोदरच सुमेध यांचा लहान भाऊ शुभम यांचीही सैन्य भरतीत निवड झाली.
शुभमला ऑक्टोबर महिन्यात सुटी मिळणार असल्याने सुमेधनेही ऑक्टोबर महिन्यातच येण्याचा बेत आखून शेगावला जाण्याचे आई-वडील व बहिणीला सांगितले होते. लवकरच कुटुंबाची भेट होणार या आनंदात दोघेही भाऊ देशसेवा करत होते; मात्र दहशतवाद्यांशी दोन हात करताना सुमेध यांना शुक्रवारी वीरमरण आले .
खासदार धोत्रे यांच्या मध्यस्थीने सुटला अंत्यसंस्काराचा प्रश्न!
शहीद जवान सुमेध गवई यांच्यावर त्यांची जन्मभूमी असलेल्या लोणाग्रा येथे १४ ऑगस्ट रोजी लोणाग्रा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार होते. मात्र, स्मशानभूमीची दुरवस्था झालेली असल्याने ग्रामस्थांनी गावालगत असलेल्या शेतात अंत्यसंस्कार व्हावे, अशी मागणी केली होती. यावर खासदार संजय धोत्रे यांनी मार्ग काढत गावातील सामाजिक कार्यकर्ते रमेश चांडक यांना विनंती करून, गावालगत असलेल्या त्यांच्या शेतात शहीद सुमेध गवई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे जागेबाबत असलेल्या वादावर पडदा पडला.
शेतकर्यांचा रास्ता रोको रद्द
शेतकरी आंदोलनासाठी सुकाणू समितीने १४ ऑगस्ट रोजी राज्यभर रास्ता रोको करण्याचे आवाहन केले आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकर्यांकडूनही आंदोलनाची तयारी करण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील लोणाग्रा येथील शहीद वीर सुमेध गवई यांना देशाच्या सीमेवर वीरमरण आले. त्यांच्यावर उद्या, १४ ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार होत आहेत. ही घटना पाहता जिल्हाभरात शेतकर्यांनी कुठेही रास्ता रोको न करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी जागर मंचने रास्ता रोको न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच वीरजवान सुमेध गवई यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे म्हटले आहे.
लोणाग्रा गावावर शोककळा!
जम्मूतील शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोल्याचे सुमेध गवई शहीद झाले. रविवारी पोलिसांकडून ही माहिती मिळताच लोणाग्रा गावावर शोककळा पसरली. दरम्यान, सुमेध हे शहीद झाल्याची वार्ता कळताच पंचक्रोशितील जनतेसह नेते, अधिकार्यांनी लोणाग्राकडे धाव घेतली.
‘प्रहार’चे आंदोलन स्थगीत
शेतकर्यांच्या प्रश्नांवर प्रहारतर्फे १४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लोणाग्रा येथील जवान सुमेध गवई हे शहीद झाल्याने सोमवारचे आंदोलन प्रहारतर्फे स्थगित करण्यात आले आहे.