रोहयोतून शेतरस्त्यांसाठी निधीच दिला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 04:03 PM2019-09-16T16:03:52+5:302019-09-16T16:04:00+5:30
अकोला, बाळापूर तालुक्यातील १ कोटी २० लाखांचा निधी अद्याप मिळालेला नाही.
अकोला: महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या राज्यातील विविध कामांवर असलेल्या मजुरांची मजुरी काही प्रमाणात अदा केल्यानंतर आता कुशल कामांचा निधी मिळण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागणी केल्यानंतरही अकोला, बाळापूर तालुक्यातील १ कोटी २० लाखांचा निधी अद्याप मिळालेला नाही.
शासनाच्या आकडेवारीनुसार राज्यात मजुरी आणि साहित्यापोटी ३४ जिल्ह्यांत योजनेच्या कामासाठी लागणाºया साहित्याच्या मोबदल्यापोटी देय असलेला २९७ कोटी ७७ लाखांपेक्षाही अधिक निधी थकीत आहे. मार्च २०१९ अखेरपर्यंत वाढच झालेली आहे. त्यामध्ये कामगारांची मजुरी, कुशल कामांच्या साहित्याच्या देयकांचा समावेश आहे. दोन वर्षांपासून एकही देयक शासनाकडून अदा होत नसल्याने ग्रामपंचायती, काम करणारे, तसेच साहित्याचे पुरवठादार कमालीचे अडचणीत आहेत. शेतरस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
रोजगार हमी योजना आयुक्तांनी घेतलेल्या आढाव्यात राज्यात २४,४३७ शेतरस्त्यांची कामे सुरू आहेत. त्या रस्त्यांच्या कुशल देयकापोटी १२ कोटी ५ लाख २४ हजार रुपये निधीची गरज आहे. त्या कामांचा निधी मिळण्यासाठी २४ मुद्यांची माहिती प्रपत्रात भरून द्यावी, असे निर्देश आयुक्तांनी डिसेंबर २०१८ मध्येच दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील दोनच तालुक्यांनी ती माहिती प्रपत्रात सादर केली. त्यामध्ये अकोला तालुक्यात ३८ रस्त्यांच्या कामासाठी ८९ लाख ८० हजार रुपये तर बाळापूर तालुक्यात १३ रस्त्यांच्या कामासाठी १९ लाख २० हजार रुपये निधीची मागणी आहे. हा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जूनमध्ये दिलेल्या प्रस्तावात केली. त्यावर अद्यापही निधी मिळाला नसल्याची माहिती आहे.
शेतरस्त्यांकडे दुर्लक्ष, इतर कामांना प्राधान्य
रोजगार हमी योजना विभागाने अंतर्गत रस्ते, सिमेंट रस्ते कामांचा समावेश केल्यानंतर शेतरस्त्यांची कामे मागे पडली आहेत. त्याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये ही कामेच सुरू झालेली नाहीत. त्यातून शेतीसाठी उपयुक्त ठरणाºया या उपक्रमांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. ती कामे तातडीने सुरू करण्याची मागणीही होत आहे.