गावात स्मशानभूमी नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन करावा लागला अंत्यविधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 04:01 PM2018-08-17T16:01:31+5:302018-08-17T16:09:01+5:30
तेल्हारा (जि. अकोला): तालुक्यातील थार या गावात स्मशानभूमी नसल्याने भर पावसात निधन झालेल्या या गावातील एका महिलेच्या पार्थिवावर चार किलोमिटर अंतरावर असलेल्या तेल्हारा शहरातील वैकुंठधाम येथे नेऊन अंत्यविधी पार पाडावा लागल्याची घटना शुक्रवारी घडली.
- सत्यशील सावरकर
तेल्हारा (जि. अकोला): तालुक्यातील थार या गावात स्मशानभूमी नसल्याने भर पावसात निधन झालेल्या या गावातील एका महिलेच्या पार्थिवावर चार किलोमिटर अंतरावर असलेल्या तेल्हारा शहरातील वैकुंठधाम येथे नेऊन अंत्यविधी पार पाडावा लागल्याची घटना शुक्रवारी घडली.
तेल्हारा तालुक्यातील थार हे अकराशे लोकसंख्येचे गाव असून, गावात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. याठिकाणी स्मशानभूमी नसल्याने कुणाचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी ग्रामस्थांची मोठी पंचाईत होते. ज्यांची शेती गावालगत आहे, त्यांच्या कुटुंबातील कुणाचे निधन झाल्यास शेतात अंत्यविधी केला जातो. इतरांसाठी मात्र गावातून तेल्हाऱ्याकडे जाणारा रस्त्यालगतचा परिसर किंवा जुन्या गावातील ई-क्लास जमीन, असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. ई-क्लास जमीनीवरील अंत्यविधीच्या जागेकडे जाण्यासाठी सुद्धा रस्ता नसल्याने ग्रामस्थांचे हाल होतात. गावातील कमलाबाई भिमराव हेरोडे यांचे १७ आॅगस्ट रोजी निधन झाले. त्यातच गत दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने पावसात अंत्यविधी कसा करावा, या विवंचनेत असताना कुटुंबियांनी चार किलोमिटर अंतरावरील तेल्हारा येथे अंत्यंविधी करण्याचे ठरविले. त्यानंतर पार्थिव एका वाहनात ठेऊन तेल्हारा शहरातील वैकुंठधाम येथे नेण्यात आला व तेथे अंत्यविधी करण्यात आला. गावात शेड असलेली स्मशानभूमी असती, तर आधीच दुखात असलेल्या कुटुंबियांना एवढी धावपळ करावी लागली नसती, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
गावामध्ये स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात नातेवाईकांची गैरसोय होवू नये म्हणून तेल्हारा येथे अंत्यसंस्कार करावे लागले. - मोहन हेरोडे, थार.
थार येथील ई क्लास जमीन जुन्या गावात आहे. तेथे जाण्यासाठी रस्ता नाही. स्मशानभूमी साठी जिल्हा परिषद कडे प्रस्ताव पाठविला आहे.
- गणेश खंडेराव, ग्रामसेवक, थार