बोगस बियाणे, खते विकणाऱ्यांची खैर नाही, कायदा करणार; कृषिमंत्री सत्तार यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 09:06 AM2023-06-11T09:06:28+5:302023-06-11T09:08:02+5:30
‘लाेकमत’च्या साेहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बाेलत हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क, अकाेला: राज्याच्या कृषी विभागाने अकाेला जिल्ह्यासह राज्यात ८७ ठिकाणी बनावट व निकृष्ट दर्जाची औषधी, बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांविराेधात छापासत्र राबविले असता, ६८ ठिकाणी अनियमितता आढळून आली. व्यावसायिकांनी पेरणीपूर्वी बनावट बियाणे, खते व औषधींचा साठा नष्ट करावा अन्यथा राज्यपालांकडे तक्रार करण्यासाेबतच अशा व्यावसायिकांना किमान १० वर्षांची शिक्षा व्हावी, असा कायदा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात करणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
‘लाेकमत’च्या साेहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बाेलत हाेते. बनावट व निकृष्ट औषधे व बियाण्यांच्या संदर्भात झालेल्या कारवाईनंतर व्यावसायिकांनी आराेप करण्यापेक्षा पाेलिसांत, लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रारी कराव्या. त्याची शहानिशा करू. छापासत्र सुरू करून कारवाईचा प्रस्ताव देणार असेही ते म्हणाले. सरकार काेणाचेही असाे, मी सत्तेत आहेच. डाेक्यावरील टाेपीत कला असल्याचे त्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
बाबुजी चालते बाेलते विद्यापीठ हाेते !
- ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांनी विद्यार्थिदशेपासून देशसेवा, समाजसेवेचा वसा घेतला हाेता. बाबूजी आमच्यासाठी चालते बाेलते विद्यापीठ हाेते.
- ‘लाेकमत’ शेतकरी, सर्वसामान्य माणसांचा आवाज आहे. राज्य व देशाच्या विकासाला हातभार लावण्यात ‘लाेकमत’चा सिंहाचा वाटा असल्याचे गाैरवाेद्गारही सत्तार यांनी काढले.
माजी संपादक व युनिट हेड यांचाही झाला सन्मान
लाेकमत अकाेला आवृत्तीची धुरा सांभाळणाऱ्या माजी संपादक व युनिट हेड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये याेगेंद्र जुनागडे, स्व. प्रभाकर पुराणिक यांची कन्या अनिमा कुळकर्णी, संजय आवटे, बाळ कुळकर्णी, गजानन जानभाेर, अविनाश दुधे, प्रेमदास राठाेड, रवी टाले, स्व. तेजकिरण दर्डा यांची कन्या भक्ती दर्डा, सुशांत दांडगे, रमेश डेडवाल यांचा समावेश आहे.