मतदान केंद्रांमध्ये मतदारांचे होणार ‘थर्मल स्कॅनिंग’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 11:07 AM2020-11-29T11:07:29+5:302020-11-29T11:09:13+5:30
पाचही जिल्ह्यात मतदान केंद्रांमध्ये आरोग्य पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
अकोला: विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काेरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीत प्रत्येक मतदान केंद्रांमध्ये मतदारांचे ‘थर्मल स्कॅनिंग’करण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात मतदान केंद्रांमध्ये आरोग्य पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रांमध्ये कोविड-१९ च्या सुरक्षात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीत मतदान केंद्रांमध्ये मतदारांचे ‘थर्मल स्कॅनिंग’ करण्यात येणार आहे. त्याकरिता मतदारसंघातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रात एक आरोग्य अधिकारी व दोन सहायकांचा समावेश असलेली आरोग्य पथके नेमण्यात आली आहेत. थर्मल स्कॅनिंगमध्ये एखाद्या मतदाराचे शारीरिक तापमान विहित मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास संबंधित मतदाराला सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान मतदान करण्यासाठी उपस्थित राहण्याकरिता टाेकन दिले जाणार असून, या कालावधीत संबंधित मतदार मतदान करू शकणार आहेत.
विलगीकरण कक्ष उभारणार!
मतदान प्रक्रिया दरम्यान, एखाद्या मतदाराचे किंवा मतदान पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यास कोविडसदृश लक्षणे आढळल्यास त्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे, तसेच पुढील उपचारात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांमध्ये एक स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यात येणार आहे.
पीपीई किटसह विविध साहित्याचे वाटप होणार!
मतदान पथकांना ३० नोव्हेंबर रोजी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोविडसदृश लक्षणे आढळून येणाऱ्या मतदारांसाठी पीपीई किटसह सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, फेसशिल्ड आदी विविध साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
जिल्हानिहाय अशी आहेत मतदान केंद्रं!
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात एकूण ७७ मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये अमरावती २५, अकोला १२, बुलडाणा १४, वाशिम ७ व यवतमाळ जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रांचा समावेश आहे.