अकोला जिल्ह्यात दोन नवीन पोलीस ठाणी होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 10:59 AM2020-08-09T10:59:42+5:302020-08-09T10:59:53+5:30
सिव्हिल लाइन्सचे पोलीस ठाण्याचे विभाजन करून उमरी आणि बाळापूरचे विभाजन करून पारस या दोन नव्या पोलीस ठाण्याचा आकृतीबंध शासनाकडे पाठविला आहे.
अकोला : शहर आणि जिल्ह्याचे वाढते परिक्षेत्र आणि त्या तुलनेत असलेल्या पोलीस ठाण्यांची संख्या पाहता अकोल्यात आणखी नव्या पोलीस ठाण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घेता बाळापूर आणि सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याचे विभाजन करून आणखी नवे दोन पोलीस ठाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. आता या प्रस्तावाला मंजुरी मिळल्यानंतर जिल्ह्यात २३ नव्हे तर २५ पोलीस स्टेशन होणार आहेत.
अकोला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे; मात्र असलेल्या पोलीस ठाण्यांची रचना आणि आता वाढती लोकसंख्या याचा मेळ घातला असता जिल्ह्यात नव्या पोलीस ठाण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा हीच बाब लक्षात घेता अकोला पोलीस विभागाने २0१५ मध्ये अकोला शहरातील सिव्हिल लाइन्सचे पोलीस ठाण्याचे विभाजन करून उमरी आणि बाळापूरचे विभाजन करून पारस या दोन नव्या पोलीस ठाण्याचा आकृतीबंध शासनाकडे पाठविला आहे. तेव्हा या दोन नवीन पोलीस ठाण्यांच्या प्रस्तावाला कधी मान्यता मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन पोलीस ठाण्यांचे होणार बांधकाम
पोलीस कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुने शहर आणि रामदासपेठ या दोन पोलीस ठाण्यांच्या इमारतीच्या बांधकामाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या इमारती बांधण्यात येणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केवळ सिटी कोतवाली आणि रामदासपेठ हे दोन पोलीस ठाणे होते. यामधील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे विभाजन करून १९७८ साली सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याची निर्मिती केली. १९९२ साली कोतवालीचे विभाजन जुने शहर ठाण्याची निर्मिती करण्यात आली तर याच वर्षी रामदासपेठचे विभाजन करून अकोट फैल तर सिव्हिल लाइन्सचे विभाजन करून खदान पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. तर २0१२ साली जुने शहर पोलीस ठाण्याचे विभाजन करून डाबकी रोड पोलीस ठाणे तर २0१५ साली सिव्हिल लाइन्स आणि खदानचे विभाजन करून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विभाजन करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तालयाचे घोंगडे भिजत
पोलीस आयुक्तालय व्हावे यासाठी शासनाकडे २0१५ साली आकृतीबंध पाठविण्यात आला होता. त्यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त झाल्यानंतर अकोला येथे पोलीस आयुक्तालयाचा प्रस्तावसुद्धा चर्चेत होता; मात्र तेव्हापासून या आयुक्तालयाचा प्रस्ताव अडकून असल्याने आयुक्तालयाचे घोंगडे भिजत आहे.