हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की, काेंबून भरलेली काली-पिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:23 AM2021-09-17T04:23:25+5:302021-09-17T04:23:25+5:30
अकोला स्थानकावरून जाणाऱ्या काही गाड्यांमध्ये हे चित्र दिसून येत आहे. कोरोना काळात रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प झाल्यानंतर हळूहळू परिस्थिती ...
अकोला स्थानकावरून जाणाऱ्या काही गाड्यांमध्ये हे चित्र दिसून येत आहे.
कोरोना काळात रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प झाल्यानंतर हळूहळू परिस्थिती सामान्य झाली आहे. तथापि, अजूनही विशेष गाड्या सुरु आहेत. या गाड्यांमध्ये पूर्वीप्रमाणे जनरल डबे नाहीत. जनरल डब्यांचे डी-२ असे नामकरण करून यामध्ये आरक्षित तिकिटावरच प्रवास करण्याची मुभा आहे. सणासुदीचे दिवस सुरु झाल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. २-एस डब्यांमध्ये जागा मिळत नसल्याने जवळचा प्रवास करणारे अनेक जण आता थेट शयनयान श्रेणीत गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.
विक्रेत्यांचीच गर्दी अधिक
रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहेच, भरीस भर म्हणून किरकोळ विक्रेतेही डब्यांमध्ये गर्दी करतात. चहा, पोहे, समोसे, स्नॅक्स विकणारे थेट डब्यांमध्ये चढून विक्री करतात. त्यामुळे आधीच गर्दी असलेल्या डब्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो.
मध्य रेल्वेच्या गाड्यांमध्ये जास्त गर्दी
अकोला हे मध्य व दक्षिण मध्य रेल्वेचे जंक्शन स्टेशन आहे. या ठिकाणी मुंबई, पुणे, नागपूर दिशेने जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. यामध्ये महाराष्ट्र एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेसमध्ये गर्दी दिसून आली.
दक्षिण मध्य रेल्वेच्या काचिगुडा, नांदेड, वाशिमकडे जाणाऱ्या गाड्या मात्र रिकाम्या धावत आहेत.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव बघू जाता गर्दी टाळण्यासाठी विशेष गाड्या धावत आहेत. या गाड्यांमध्ये केवळ आरक्षित तिकिटावरच प्रवेश करण्याची मुभा आहे. जेवढी आसने तेवढीच तिकिटे ऑनलाईन दिली जात आहेत. त्यामुळे गर्दी होण्याचे कारण नाही.
२-एस डब्यांचे तिकीट काढलेले शयनयान श्रेणीतून प्रवास करत असतील, तर अशा प्रवाशांवर कारवाई होऊ शकते, असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.