अन् त्यांनी रुग्णांपर्यंत पोहोचविली औषधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 10:28 AM2020-07-19T10:28:36+5:302020-07-19T10:28:55+5:30

विहान संस्थेंतर्गत काही एचआयव्ही बाधित इतर सहकारी रुग्णांसाठी कोरोना योद्धा म्हणून समोर आले.

They finally delivered the medicine to the patients! | अन् त्यांनी रुग्णांपर्यंत पोहोचविली औषधी!

अन् त्यांनी रुग्णांपर्यंत पोहोचविली औषधी!

Next

- प्रवीण खेते  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विरुद्धच्या लढ्यात अनेक जण कोरोना योद्धा म्हणून समोर आलेत; पण स्वत:चाच जीव धोक्यात असताना इतर सहकारी रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी अकोल्यातील ‘नेटवर्क आॅफ अकोला बाय पीपल लिव्हिन विथ एचआयव्ही’ म्हणजेच विहान संस्थेने गावोगावी फिरून सहकाऱ्यांना एचआयव्हीची औषधी वाटण्याचे काम गत तीन महिन्यांपासून करत आहेत. हा उपक्रम राबविताना त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत असला, तरी हार न मानता परिस्थितीशी झगडत त्यांनी अनेकांपर्यंत एचआयव्हीची औषधी पोहोचविण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवले आहे. कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरू असताना त्यावर नियंत्रणासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केले. संचारबंदीचा अनेकांना फटका बसला; पण हा काळ काही रुग्णांच्या जीवावरदेखील बेतला. विशेषत: एचआयव्ही बाधितांना या काळात औषधी मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत विहान संस्थेंतर्गत काही एचआयव्ही बाधित इतर सहकारी रुग्णांसाठी कोरोना योद्धा म्हणून समोर आले. त्यांनी हा धाडसी निर्णय तर घेतला; परंतु स्वत:ची रोगप्रतिकारकशक्ती सांभाळून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या काळात त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागासह बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात जाऊन एचआयव्हीग्रस्तांपर्यंत औषधी पोहोचविली. हे सर्व करत असताना त्यांना अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले. तरी देखील त्यांनी गत तीन महिन्यात ९५० एचआयव्हीग्रस्तांपर्यंत औषधी पोहोचविली.


हे होते आव्हान
लॉकडाऊनच्या काळात रुग्णांपर्यंत औषधी पोहोचविण्याचे धाडस तर त्यांनी केले; पण त्यानंतरचे सर्वात मोठे आव्हान होते ते संबंधित रुग्णाची ओळख गोपनीय ठेवण्याचे. कारण गावात प्रवेश करताच विहानच्या चमूची चौकशी सुरू व्हायची, कोणाकडे जायचे, काम काय आहे, अशी विचारणाही व्हायची. त्यामुळे रुग्णाची ओळख उघड होण्याची शक्यता जास्त होती; मात्र हे आव्हान पेलून त्यांनी रुग्णांपर्यंत औषधी पोहोचविल्यात.


धान्य किटचे वाटप
रुग्णांपर्यंत औषधी पोहोचविण्यासोबतच विहान संस्थेने १७५ गरजूंपर्यंत धान्य पोहोचविण्याचे कार्यही केले. यासाठी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मदत केली. हे कार्य करत असताना नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, अशी माहिती विहानच्या अध्यक्षा शुभांगी खराटे यांनी दिली.

 

Web Title: They finally delivered the medicine to the patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.