‘ते’ रक्तदान करून जपतात ‘जिव्हाळा’; रक्तदानासाठी १२००सदस्य २४ तास तत्पर
By atul.jaiswal | Published: October 1, 2018 12:03 PM2018-10-01T12:03:19+5:302018-10-01T12:10:32+5:30
केवळ रक्त नसल्यामुळे कोणाचे प्राण जाऊ नये, या उद्दात्त हेतूने अकोल्यात रक्तदात्यांची एक फळीच तयार झाली असून, यासाठी ‘जिव्हाळ्याचे रक्तदाते’ हा ग्रुप तयार करण्यात आला आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : रक्तदानाबाबत अजूनही पुरेशी जागृती नसल्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा ही नित्याचीच बाब झाली आहे. केवळ रक्त नसल्यामुळे कोणाचे प्राण जाऊ नये, या उद्दात्त हेतूने अकोल्यात रक्तदात्यांची एक फळीच तयार झाली असून, यासाठी ‘जिव्हाळ्याचे रक्तदाते’ हा ग्रुप तयार करण्यात आला आहे.
रक्ताला पर्याय नसल्यामुळे मनुष्याला लागणाऱ्या रक्ताची पूर्तता केवळ मानवी रक्तानेच होऊ शकते. शस्त्रक्रिया, अपघात, सिझेरियन, थॅलेसिमिया, सिकलसेल आदी आजारांमध्ये रक्ताची नितांत गरज भासते. शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा नेहमीच तुटवडा असतो. एखाद्याला गरज भासली, तर ‘डोनर’शिवाय पर्याय नसतो. अनेकदा रक्त नसल्यामुळे रुग्णाला प्राणही गमवावा लागतो. या सर्वांवर मात करण्यासाठी अकोल्यातील काही तरुणांनी समोर येऊन १३ आॅगस्ट २०१६ रोजी ‘जिव्हाळ्याचे रक्तदाते’ हा ग्रुप स्थापन केला. बघता-बघता या ग्रुपसोबत १२०० रक्तदाते जुळले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय किंवा शहरातील कोणत्याही खासगी इस्पितळात दाखल असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास या ग्रुपमधील सदस्य मदतीसाठी धावून येतात. ग्रुपच्या सदस्यांकडून रक्तदान शिबिरांचेही आयोजन केले जाते.
व्हॉट्स अॅप ग्रुपवर होते आदान-प्रदान
या ग्रुपच्या सदस्यांनी दोन व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केले असून, या गु्रपवर माहितीचे आदान-प्रदान केले जाते. एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असल्यास ग्रुपमधील सदस्य रुग्णाचे नाव, तो कोठे भरती आहे, रक्तगट कोणता, याबाबत ग्रुपवर माहिती टाकतात. संबंधित रक्तगट असलेला ग्रुपमधील सदस्य त्याची दखल घेऊन रक्तदान करतो.
यावर्षी वाचविले ७०० जणांचे प्राण!
ग्रुपमधील सदस्य २४ तास रक्तदानासाठी तयार असतात. तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करता येते. रक्तदात्यांची मोठी फळी असल्यामुळे ‘डोनर’ नेहमीच उपलब्ध असतात. ग्रुपमधील सदस्यांनी केलेल्या रक्तदानामुळे यावर्षी ७०० जणांचे प्राण वाचविता आल्याची माहिती ग्रुपचे समन्वयक पवन डांबलकर यांनी दिली. या ग्रुपमध्ये आशिष कसले, आशिष सावळे, निशिकांत बडगे, विपुल माने, निखिल साबळे, मोहन लुले यांच्यासह सर्वच सदस्य सक्रिय असतात.