अस्वच्छता जैसे थे!
By admin | Published: September 26, 2014 01:52 AM2014-09-26T01:52:44+5:302014-09-26T02:00:20+5:30
अकोला शहरातील स्वच्छतेसाठी पुन्हा हेल्पलाईनची घोषणा.
अकोला : अस्वच्छता व साफसफाईअभावी संपूर्ण शहरात साथ रोगांचा फैलाव झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी राखणे महापालिकेचे कर्तव्य असताना, वरिष्ठ अधिकार्यांनी झोपेचे सोंग घेतल्याची विदारक परिस्थिती आहे. अकोलेकरांचा जीव धोक्यात सापडल्याच्या वृत्तानं तर मनपा प्रशासनाने थातूरमातूर हेल्पलाईन सुरू केली असून, २४ स्वच्छता निरीक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले. स्वच्छतेच्या मुद्यावर प्रशासनाची एकूणच भूमिका लक्षात घेता, कागदोपत्री घोषणाबाजी केल्याचे दिसून येते. शहरात दैनंदिन साफसफाई करण्याची नैतिक जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. पडीत २0 प्रभागातील स्वच्छतेसाठी तब्बल ६00 खासगी कर्मचारी तर उर्वरित १६ प्रभागांसाठी ७00 सफाई कर्मचार्यांची प्रशासनाने नियुक्ती केली. अर्थातच, मुख्य रस्ते, प्रभागातील प्रत्येक गल्ली बोळासह सव्र्हीस लाईन व सार्वजनिक जागेच्या स्वच्छतेसाठी चक्क १ हजार ३00 सफाई कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय कचरा उचलण्याचा कंत्राट खासगी संस्थेला देण्यात आला असून, याकरिता १८ ट्रॅक्टरद्वारे दररोज कचरा उचलल्या जात असल्याचा दावा कंत्राटदारासह महा पालिकादेखील करते. अर्थातच, या बदल्यात संबंधित कंत्राटदाराचे देयक अदा केल्या जात आहे. निव्वळ कचरा व साफसफाईच्या विषयावर कोट्यवधींचा खर्च होत असला तरी स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे. परिणामी अकोल्यात कावीळ, हिवताप व डेंग्यूसारख्या गंभीर साथ रोगांनी थैमान घातले. हा मुद्दा ह्यलोकमतह्णने चव्हाट्यावर आणल्यानंतर झोपेतून जागे झालेल्या प्रशासनाने वैद्यकीय अधिकारी, साथ रोग अधिकारी, हिवताप अधिकारी, आरोग्य अधिकार्यांची बैठक घेतली. अकोलेकरांसाठी संपूर्ण २७ स्वच्छता निरीक्षकांचे भ्रमणध्वनी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.