कोरोनामुळे चोरटेही घरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:22 AM2021-04-30T04:22:55+5:302021-04-30T04:22:55+5:30
अकोला : कोरोनाचे भीषण संकट गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून देशावर ओढवले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र ...
अकोला : कोरोनाचे भीषण संकट गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून देशावर ओढवले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक घरातच असल्याने चोरटेही घरबंद झाल्याचे दिसून येत आहे. चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१९ या वर्षात तब्बल ३५६ चोरी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये काही लहान व काही मोठ्या घरफोड्या असल्याची माहिती आहे. त्यानंतर २०२० या वर्षातही तब्बल १६३ चोऱ्या झाल्याची माहिती असून २०२१ या वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत केवळ २८ चोऱ्या झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. यावरून चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. याला मुख्य कारण म्हणजे लॉकडाऊनमुळे तसेच कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिक आजही घरातच बसून आहेत. घराबाहेर निघणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. सहल, बाहेर फिरायला जाणे, कुटुंबीयांसोबत लग्नसोहळे करणे यासह विविध कार्यक्रम व बाहेर फिरणाऱ्यांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिक हे घरातच असल्याने चोरीच्या घटना ही प्रचंड प्रमाणात कमी झाल्या आहेत.
२०१९ मध्ये झालेल्या चोऱ्या ३५३
२०२० मध्ये झालेल्या चोऱ्या १६३
२०२१ एप्रिल महिन्यापर्यंत झालेल्या चोऱ्या २८
खुनाच्या घटना घटल्या
दरम्यान जिल्ह्यात चोरीच्या घटना ज्याप्रमाणे कमी झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे खून व हत्याकांडही कमी झाले आहेत. अंतर्गत वादातून तसेच कौटुंबिक कलहातून तीन ते चार खून झाल्याची माहिती आहे. मात्र २०१९ या वर्षाच्या तूलनेत २०२० आणि २१ या दोन वर्षात खुणाच्या घटना कमी झाल्याची माहिती आहे.
बलात्कार, विनयभंगही घटले
जिल्ह्यात कोरोनामुळे कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. याच कारणामुळे बहुतांश नागरिक घरात आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने तडीपार तसेच हद्दपार करण्यात आले आहे. तर काही जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे बलात्कार विनयभंग यासारख्या घटना प्रचंड प्रमाणात कमी झाल्या आहेत. २०१९ या वर्षाच्या तुलनेत कोरोनाच्या संकटात बलात्कार व विनयभंगाच्या घटना अर्ध्यावर आलेल्या आहेत.
जिल्ह्यात चोरीच्या घटना कमी झालेल्या आहेत. पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर आहेत. संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर तसेच शहराच्या प्रत्येक सीमेवर व शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे चोरट्यांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. याचेच फलित म्हणून जिल्ह्यात चोरीच्या घटना खूप कमी झाल्या आहेत.
जी श्रीधर
पोलीस अधीक्षक अकोला