राष्ट्रीय लोकसंख्या रजिष्टर अद्ययावतीकरणात बुलडाणा जिल्हा राज्यात तिसरा
By admin | Published: February 16, 2016 12:57 AM2016-02-16T00:57:45+5:302016-02-16T00:57:45+5:30
खामगाव येथील शिक्षकांच्या बहिष्कारामुळे निर्माण झाला होता पेच.
खामगाव : राष्ट्रीय लोकसंख्या रजिष्टर अद्ययावतीकरणात बुलडाणा जिल्ह्याने राज्यातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. उल्लेखनीय म्हणजे, शिक्षकांनी या कामी बहिष्कार टाकल्यानंतर नगरपालिका, पंचायत समिती कर्मचारी आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या माध्यमातून तोडगा काढत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणासाठी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या विविध शाळांमधील शिक्षकांची प्रगणक म्हणून ऑक्टोबर महिन्यात नियुक्ती केली होती; मात्र शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांना जनगणना, नैसर्गिक आपत्ती, निवडणूक अशी कामे वगळता अन्य कोणतीही अशैक्षणिक कामे दिल्या जावू नये. त्याचप्रमाणे शिक्षक सरल डाटाबेस माहिती ऑनलाइन भरणे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र पायाभूत चाचणी, प्रथम सत्र आकारीत व संकलीत मूल्यमापन व त्यांच्या नोंदींची कामे असल्याचे कारण पुढे करीत, खामगाव नगरपालिकेच्या ४८ शिक्षकांसह जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी एनपीआर सर्वेक्षणाच्या कामास स्पष्टपणे नकार दर्शविला होता. इतकेच नव्हे तर प्राथमिक शिक्षक संघाच्या खामगाव शाखेसह राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी एनपीआर नोंदणी अद्ययावतीकरणाच्या प्रशिक्षणावर बहिष्कारही टाकला होता. राज्यातील सुमारे १५ हजार शिक्षकांनी या कामी नकार दर्शविल्यामुळे स्थानिक प्रशासनासमोर सर्वेक्षणाचा पेच निर्माण झाला होता. दरम्यान, या राष्ट्रीय कार्यासाठी नगरपालिका आणि महापालिका स्तरावर विविध विभागातील कर्मचार्यांसह, आयटीआयमधील शिकाऊ उमेदवार आणि काही सुशिक्षित बेरोजगारांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षकांच्या बहिष्कारावर तोडगा! राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) च्या अद्ययावतीकरणासाठी स्थानिक प्रशासनाच्या विविध विभागातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सुशिक्षित बेरोजगारांची मदत घेण्यात आली. सुरुवातीला ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावयाचे हे सर्वेक्षण नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पूर्ण करण्यात आले. त्यानंतर जानेवारी अखेरीस या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. शिक्षकांनी बहिष्कार टाकल्यानंतरदेखील स्थानिक प्रशासनाने यशस्वी तोडगा काढत, सर्वेक्षण पूर्ण केले. जिल्हाधिका-यांकडून अभिनंदन! केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, राज्यात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी रजिस्टर अद्ययावत करण्याच्या कामात स्थानिक प्रशासनाने कार्यतत्परता दाखविली. विहित मुदतीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाल्याने जनगणना कार्यालयाच्या यादीमध्ये बुलडाणा जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी संबंधित प्रशासकीय अधिकार्यांना पत्र देत, अभिनंदन केले आहे, तसेच भविष्यातही अशाच तत्परतेची अपेक्षा व्यक्त केली आहे.