अवघ्या सहा महिन्यांत पिंजर-बार्शीटाकळी रस्त्याचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:21 AM2021-09-26T04:21:10+5:302021-09-26T04:21:10+5:30
निहिदा : सहा महिन्यांपूर्वी जवळपास सात कोटी रुपये खर्चून पिंजर- बार्शीटाकळी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. अवघ्या सहा ...
निहिदा : सहा महिन्यांपूर्वी जवळपास सात कोटी रुपये खर्चून पिंजर- बार्शीटाकळी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. अवघ्या सहा महिन्यांतच सद्य:स्थितीत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २१ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर तब्बल ६१ जीवघेणे खड्डे पडले आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत बार्शीटाकळी- पिंजर- कारंजा रस्त्याचे काम करण्यात आले. संबंधित कंत्राटदाने अंदाजपत्रकाप्रमाणे काम न केल्याने, तसेच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. अवघ्या सहा महिन्यांमध्ये पिंजर ते बार्शीटाकळी या रस्त्यावर सुमारे ६१ खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविताना येथील प्रभाकर केदार यांचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. मात्र, तरीही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने रस्त्यावरील खड्डे ‘जैसे थे’ आहेत. रस्त्याच्या संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधला असता उडवाउडवीचे उत्तर मिळत आहेत. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
-----------------
मी रस्त्याच्या निकृष्ट कामाची तक्रार केली होती. अधिकारी आणि कंत्राटदाराचे साटेलोटे असल्यामुळे ठोस कार्यवाही झाली नाही. बार्शीटाकळी- पिंजर- कारंजा रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे.
-गजानन पाटील मानतकर, तालुका शिवसेनाप्रमुख, बार्शीटाकळी
-----------------------
रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. बार्शीटाकळी- पिंजर-कारंजा रस्त्याचे बोगस काम झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची चौकशी करून कारवाई करावी.
-अमर देशमुख, माजी ग्रा.पं. सदस्य, पिंजर