तणनाशकांच्या किमतीत तीस टक्क्यांनी वाढ शेतकरी आर्थिक कोंडीत

By रवी दामोदर | Published: July 18, 2023 04:54 PM2023-07-18T16:54:02+5:302023-07-18T16:55:34+5:30

शेतशिवार बहरले; फवारणीला आला वेग

Thirty percent increase in the price of herbicides put farmers in financial crisis | तणनाशकांच्या किमतीत तीस टक्क्यांनी वाढ शेतकरी आर्थिक कोंडीत

तणनाशकांच्या किमतीत तीस टक्क्यांनी वाढ शेतकरी आर्थिक कोंडीत

googlenewsNext

अकोला : सध्या शेतशिवारात पिके अंकुरले असून, शेती अंतर्गत मशागतीला वेग आला आहे. तण व किडींचा बंदाेबस्त करण्यासाठी सोयाबीन, कपाशी पिकांत तणनाशक व कीटकनाशकांची फवारणी सुरू आहे. पंरतु गतवर्षीच्या तुलनेत यंदा तणनाशकांच्या किमतीत तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गतवर्षीर २०२२ मध्ये ३ हजार ८०० रुपयांना मिळणाऱ्या तणनाशकासाठी शेतकऱ्यांना यंदा ४ हजार ९०० रुपये मोजावे लागत आहे. प्रतिलिटर मागे तब्बल ११०० रुपयांची वाढ झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
पाऊस उशिराने आल्याने जिल्ह्यातील पेरण्या लांबल्या आहेत.

सध्या खरीप पेरणीची लगबग दिसून येत आहे. सुरुवातीची पेरणी केलेल्या शेतशिवारात पिकांसोबत मोठ्या प्रमाणात तण निघाले आहे; तण नियंत्रणासाठी मजुराला पर्याय असणाऱ्या तणनाशकाच्या फवारणीला वेग आला आहे. परंतु गत वर्षभरात ३० ते ४० टक्क्यांनी तणनाशकाच्या किमती भडकल्या आहेत. सध्या तणनाशकाच्या लिटरमागे ७०० ते ११०० रुपये शेतकऱ्यांना जास्त मोजावे लागत आहेत. त्यामुळे तण नियंत्रणासाठी लागणारे पैसे आणायचे कोठून, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

ग्रामीण भागात मजूर मिळेना

जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच असून, शेतकरी सुखावला आहे. आगामी दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतीकामे लवकर उरकविण्यात बळीराजा व्यस्त आहे. पेरणी, फवारणी, निंदण आदी कामे एकाच वेळी आल्याने शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे. पर्यायी जादा मजुरी देऊन काम करावी लागत आहेत. मजुरीमध्ये वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. दुसरीकडे, वाढलेल्या महागाईमुळे जगणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे मजुरीचे दर वाढविल्याचे मजुरांनी सांगितले. निंदणासाठी मजुरी २०० ते २५० रुपये व फवारणीचे ३००-३५० रुपये या प्रमाणे शेतकऱ्यांना मजुरांना मजुरी द्यावी लागत असल्याचे चित्र आहे.

८४ कीटकनाशक केंद्रांची केली तपासणी!

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत कीटकनाशक केंद्रांची तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात सातही तालुक्यांत एकूण ४५३ कीटकनाशक विक्री केंद्रे आहेत. जूनअखेरपर्यंत त्यापैकी केवळ ८४ कीटकनाशक विक्री केंद्रांची तपासणी कृषी विभागामार्फत करण्यात आल्याचे चित्र आहे.

काही तणनाशकांच्या किमतीचा अहवाल (प्रतिलिटर)

सन २०२२ - सन २०२३ - वाढ
३८०० रुपये - ४९०० रुपये - ११०० रुपये

३२७० रुपये - ४००० रुपये - ७३० रुपये

Web Title: Thirty percent increase in the price of herbicides put farmers in financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.