फरदळीचा मोह टाळा, गुलाबी बोंडअळीला बसणार आळा; कपाशीचे पीक अंतिम टप्प्यात

By रवी दामोदर | Published: January 15, 2024 06:28 PM2024-01-15T18:28:35+5:302024-01-15T18:28:44+5:30

जिल्ह्यात कृषी विभाग करणार जनजागृती

This year too, bollworm infestation has been observed on the cotton crop. | फरदळीचा मोह टाळा, गुलाबी बोंडअळीला बसणार आळा; कपाशीचे पीक अंतिम टप्प्यात

फरदळीचा मोह टाळा, गुलाबी बोंडअळीला बसणार आळा; कपाशीचे पीक अंतिम टप्प्यात

अकोला : गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणामुळे कपाशी उत्पादनात प्रचंड घट होते. यंदाही कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. सध्या कपाशीचे पीक अंतिम टप्प्यात असून, पुढील हंगामाकरीता गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस पिकाच्या फरदडीचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हाभरात कृषी विभाग जनजागृती करणार आहे.

खरीप हंगामात मान्सून उशिराने दाखल झाल्याने पेरण्या विलंबाने झाल्या. सध्या कापूस पीक हंगाम अंतिम टप्यात असून, जादा उत्पादनासाठी काही ठिकाणी कापसाची फरदड घेण्याची शक्यता आहे. फरदडीमुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र वर्षभर सुरु राहते. त्याचबरोबर, जिनिंग व प्रेसिंग मिल, गोदामे, मार्केटयार्ड याठिकाणी कच्च्या कापसाची दीर्घ काळासाठी साठवणूक केली जात असल्याने अशा कापसामध्ये राहिलेल्या गुलाबी बोंडअळीच्या अवस्था नंतर घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या पिकासाठी स्रोतस्थान म्हणून काम करतात. किडीस निरंतर खाद्य मिळत राहिल्याने पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उपाययोजना म्हणून फरदड निर्मुलन करणे हा कपाशी पिकामध्ये महत्वाचा भाग असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी सांगितले.

बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे उपाय करा!
फरदडपासून मिळणारे उत्पन हे साधारणत: डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत घेतले जाते. हा कालावधी गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक असून प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. कापसाची तिसरी वेचणी झाल्यानंतर म्हणजेच डिसेंबर ते जानेवारी महिन्यानंतर शेतातून कापूस पिक काढून घ्यावे. कापसाची शेवटची वेचणी झाल्यानंतर चरण्यासाठी बकऱ्या,गाई इतर ढोरे सोडावेत. जनावरानी प्रादुर्भाव युक्त बोंडे खाल्ल्यामुळे ७० टक्क्यांपर्यंत बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

पऱ्हाट्याचा शेतात ढीग रचून ठेवू नये. त्यामुळे बोंडअळी ढिगाखाली कोषावस्थेत जाऊन लपू शकते. काढलेल्या पऱ्हाटयाचे कंपोस्ट खत बनविण्यावर भर देण्यात यावा. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करून पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस पिकाच्या फरदडीचे निर्मूलन करावे. - शंकर किरवे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अकोला.

Web Title: This year too, bollworm infestation has been observed on the cotton crop.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.