निवडणुकीत ‘नापासांचा’ ईव्हीएम विरोधात मोर्चा; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर प्रहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:05 PM2019-08-07T12:05:55+5:302019-08-07T12:06:03+5:30
निवडणुकीत जनतेने नापास केलेल्या विरोधकांनी आता ईव्हीएम विरोधात मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. हा मोर्चा ‘नापासांचा’ मोर्चा असेल, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अकोला: ज्या ईव्हीएमच्या भरवशावर काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसने आतापर्यंत सर्वच सत्ता उपभोगली त्याच ईव्हीएम विरोधात आता त्यांनी ओरड सुरू केली आहे. सुप्रिया सुळे बारामतीत जिंकल्या तर ईव्हीएम चांगले अन्यथा नाही, असा त्यांचा दुटप्पी खाक्या असून, निवडणुकीत जनतेने नापास केलेल्या विरोधकांनी आता ईव्हीएम विरोधात मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. हा मोर्चा ‘नापासांचा’ मोर्चा असेल, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने ते मंगळवारी अकोल्यात आले होते. येथील अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर आयोजित सभेत त्यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा देतानाच विरोधकांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, विरोधी पक्षांचे नेते जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी मुजोरी केली, त्यामुळेच जनतेने त्यांना घरी बसविले आहे. आता जनतेकडे जाण्यासाठी त्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यामुळे त्यांनी ईव्हीएमच्या विरोधात ओरड सुरू केली आहे. विरोधकांनी जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष केला पाहिजे, ती त्यांची जबाबदारी आहे. जनतेच्या प्रश्नांवर मोर्चा काढला पाहिजे; मात्र ते ईव्हीएमला दोष देत मोर्चा काढत आहेत. हा प्रकार म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्याने पेनाला दोष देण्यासारखे आहे, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेस पक्षाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यांना अध्यक्षच मिळत नाही. त्यांनी मुंबईत गेटवे आॅफ इंडियावर उभे राहावे, तेथून चिठ्ठी टाकावी. ज्याच्या हाती लागेल त्याला अध्यक्ष करावे, असा उपहासात्मक सल्लाही दिला. राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या गळती सुरू झाली आहे. या पक्षाचे नेते शरद पवार सर्वांना पक्षातच थांबा, असे सांगतात; मात्र कोणीही थांबायला तयार नाही. त्यांचा पक्ष हे बुडते जहाज आहे. सर्वच नेते आता पटापट उड्या मारत आहेत, अशी टीका त्यांनी केली. विरोधांचा खरपूस समाचार घेतानाच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशात सुरू झालेल्या विकास पर्वाची प्रशंसा करून राज्यात झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा त्यांनी मांडला. काश्मीरसंदर्भात केंद्र सरकाराने घेतलेल्या भूमिकेमुळे आता प्रत्येक नागरिकाची छाती ५६ इंचाची झाली आहे. ‘गर्व से कहो काश्मीर हमारा है’ असा नारा त्यांनी दिली. यावेळी मंचावर कामगार मंत्री डॉ. संजय कुटे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार सूरजसिंह ठाकूर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, महापौर विजय अग्रवाल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील, किशोर मांगटे उपस्थित होते.