खोट्या स्वाक्षरी करून हजारो पदवीधर मतदारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:33 AM2017-09-09T01:33:49+5:302017-09-09T01:33:54+5:30
अकोला: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत उतरणार्या काही संघटनांनी खोट्या स्वाक्षरी करून हजारो पदवीधर मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप युवाविश्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. संतोष गावंडे यांनी विद्यापीठातील कुलसचिवांकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत उतरणार्या काही संघटनांनी खोट्या स्वाक्षरी करून हजारो पदवीधर मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप युवाविश्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. संतोष गावंडे यांनी विद्यापीठातील कुलसचिवांकडे केली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २0१६ नुसार विद्यापीठ सिनेट, विद्वत परिषद आणि अभ्यास मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली. या निवडणुकीमध्ये मतदार यादीत मे २0१६ व जुलै २0१७ या कालावधीत अमरावती विभागातील हजारो पदवीधरांनी, नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघात सभासद म्हणून नोंदणी केली. या नोंदणीचा व्हॅलूम प्रकाशित झाल्यानंतर मतदार नोंदणी बंधनकारक आहे. पण, व्हॅलूम प्रकाशित झाल्यानंतर शेकडो पदवीधर सभासद त्यांच्या नावाची मतदार म्हणून ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी गेले असताना, त्यांची नोंदणी होत नव्हती, आधीच नोंदणी झाल्याची सूचना लिहून येत होती. त्यामुळे पदवीधरांचा संभ्रम वाढला. त्यांच्या नावाची नोंदणी केली नसताना, नोंदणी झाल्याचे कसे काय दर्शविण्यात येत आहे. त्यामुळे आता विद्या पीठाकडे मूळ प्रत सादर कशी करावी, असा त्यांना प्रश्न पडला. त्यामुळे पदवीधरांच्या या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना मतदानाचा अधिकार व न्याय मिळवून देण्यासाठी ‘युवाविश्व’ संघटनेचे संस्था पक अध्यक्ष अँड. संतोष गावंडे यांनी १३ जुलै २0१७ रोजी सहायक कुलसचिव तथा उप निवडणूक निर्णय अधिकारी पी.यू. तालान यांची भेट घेतली आणि पदवीधरांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारावे किंवा नोंदणी झालेल्या पदवीधरांच्या नावांचा मतदार यादीमध्ये समावेश करावा, अशी मागणी अँड. गावंडे यांनी केली; परंतु त्यांनी मतदार यादीमध्ये कोणताही बदल करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
खोट्या स्वाक्षरी करून नोंदणी केली कुणी?
पदवीधरांना नोंदणीची माहिती नव्हती, तर त्यांच्या खोट्या स्वाक्षरी करून नोंदणी केली कोणी आणि हे अर्ज वैध कसे ठरले. यासंबंधी ‘युवाविश्व’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. संतोष गावंडे यांनी ५ स प्टेंबरला तक्रार दाखल करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच यासंबंधीची तक्रार कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडे सुद्धा केली आहे.
विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी पदवीधरांची नोंदणी प्रचलित पद्धतीने आणि नियमानुसार झाली आहे. त्यामुळे पुन्हा ऑनलाइन अर्ज स्वीकारणे किंवा मतदार यादी पदवीधरांच्या नावांचा समावेश करता येणार नाही. युवाविश्वच्या आरोपांमध्ये तथ्य नाही; परंतु त्यांच्या काही सूचना स्वागर्ताह आहेत.
- डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, एसंत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती