पैसे वाचवण्यासाठीच हजारो गावांना दुष्काळातून वगळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2016 02:49 AM2016-03-05T02:49:39+5:302016-03-05T02:57:57+5:30
अकोला जिल्हय़ाच्या दौ-यात विखे पाटील यांचा युती शासनावर प्रहार.
अकोला: ग्रामीण भागात दुष्काळी कामावर पैसे खर्च होऊ नयेत, या हेतूनेच युती शासनाने गावाची आणेवारी कमीत कमी ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याने राज्यासह विदर्भातील हजारो गावांमध्ये दुष्काळ असतानाही तो जाहीर झाला नाही, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण पाटील यांनी शुक्रवारी केली.
दुष्काळी उपाययोजनांची समीक्षा व शेतकर्यांशी थेट संवाद साधण्यासाठी विखे पाटील ४ मार्च रोजी अकोला व वाशिम जिल्हय़ाच्या दौर्यावर आले होते. या दौर्यात त्यांनी अकोला जिल्हय़ातील गांधीग्राम, किनखेड, उगवाफटा, कापशी, पातूर तालुक्यातील बाभूळगाव आदी गावांना भेटी दिल्या. स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व शेतकर्यांशी त्यांनी याप्रसंगी संवाद साधला. शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. बाभूळगाव येथे एका सभेत बोलताना त्यांनी भाजपा - शिवसेना सरकारला शेतकर्यांप्रति अजिबात आस्था नाही. या परिस्थितीत सरकारने शेतकर्यासाठी तिजोरी खुली करायला हवी होती; परंतु हे सरकार तिजोरीतील पैसे कसे वाचतील याचाच विचार करण्यात व्यस्त आहे. मेक इंडिया, स्टॉर्टअप इंडिया यात महाराष्ट्रातील गोरगरीब, शेतकरी, सर्वसामान्यांना कुठेच स्थान नाही. त्यामुळे मेक इन, स्टॉर्ट अपच्या ऐवजी आता वाइंड अप अर्थात यांनाच गुंडाळण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. या सर्व पृष्ठभूमीवर आगामी अधिवेशनात काँग्रेस पक्ष सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाभूळगाव येथे आयोजित सभेत प्रक ाश तायडे यांनी प्रास्ताविकातून जिल्हय़ातील दुष्काळ व शेतकर्यांची व्यथा मांडली. जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हिदायत पटेल व माजी आमदार लक्ष्मण तायडे यांनी शेतकर्यांच्या व्यथा मांडल्या. दौर्यात विखे पाटील यांच्यासोबत आमदार अमित झनक, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, वाशिम जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दिलीप सरनाईक, माजी आमदार लक्ष्मण तायडे, प्रा. अजहर हुसेन, दादाराव मते पाटील, डॉ. सुभाष कोरपे, प्रकाश तायडे, डॉ. सुधीर ढोणे, मनपातील विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, राजेश भारती, उषा विरक, साधना गावंडे, सुभाष पाटील गावंडे, महेश गणगणे, अविनाश देशमुख, हेमंत देशमुख, कामगार सेलचे नेते बद्रुज्जमा, नगरसेवक अब्दुल जब्बार प्रामुख्याने उपस्थित होते.