कोरोनाचा धोका कायमच; मुलांना घराबाहेर साेडू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:16 AM2021-05-17T04:16:40+5:302021-05-17T04:16:40+5:30
बालरुग्णांसाठी ८० खाटांचे नियोजन सद्य:स्थितीत कोविडच्या बालरुग्णांसाठी कोविड वॉर्डातच व्यवस्था करण्यात आली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता सुपर स्पेशालिटी ...
बालरुग्णांसाठी ८० खाटांचे नियोजन
सद्य:स्थितीत कोविडच्या बालरुग्णांसाठी कोविड वॉर्डातच व्यवस्था करण्यात आली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीमध्ये प्रस्तावित असलेल्या कोविड रुग्णालयात बाल रुग्णांसाठी ८० खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी कोविडच्या गंभीर बाल रुग्णांना ४० ऑक्सिजन खाटांच्या सुविधेसोबतच २० व्हेंटिलेटरची सुविधादेखील असणार आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांसाठी आवश्यक पूर्वतयारी केली जात असल्याचे चित्र सद्य:स्थितीत दिसून येत आहे.
लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे काय?
बालकांमध्ये कोरोनाची प्रामुख्याने सर्दी, ताप, खोकला, हगवण लागणे, आदी महत्त्वाची लक्षणे आढळून येतात. बालकांमध्ये ही लक्षणे आढळताच पालकांनी त्यांना तत्काळ बाल रोग तज्ज्ञांकडे घेऊन जाणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते बालकांमधील या समस्या नेहमीच्याच औषधांनी सुटत असल्याने पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, या लक्षणांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
कुटुंबात कुणाला कोरोना होऊन गेल्यानंतर लहान बालकांमध्ये गोवरची लक्षणे किंवा अंगावर चट्टे येणे, तोंड येणे, डोळे येणे, आदी लक्षणे आढळू शकतात.
ही लक्षणे आढळल्यास बालकांना कावासाकी हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत पालकांनी तत्काळ बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
त्रीसूत्रीचे पालन करणे शिकवा
लहान मुलांना कोरोनासह इतर विषाणूजन्य आजारापासून बचावासाठी त्रीसूत्रीचे पालन करण्याचे मार्गदर्शन पालकांनी करावे. यामध्ये प्रामुख्याने मास्क कसा घालावा, इतरांपासून सुरक्षित अंतर कसे राखावे तसेच वारंवार साबणाने स्वच्छ हात धुणे, आदींचे मार्गदर्शन करावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, त्याचा परिणाम लहान बालकांवरही होत आहे. अनेक बालकांमध्ये सर्दी, ताप, खोकल्यासह हगवण लागण्याची लक्षणे आली आहेत. मात्र, पालकांनी यामुळे घाबरून न जाता योग्य काळजी घेण्याची गरज आहे. अशी लक्षणे दिसताच बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच घरात कुणाला कोरोना होऊन गेल्यावर बालकांमध्ये गोवर, तोंड येणे, डोळे येणे, आदी लक्षणे आढळल्यास कावासाकी या आजाराचा धोका असू शकतो. त्यामुळे विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.
- डाॅ. विनीत वरठे, बालरोगतज्ज्ञ, जीएमसी, अकोला
० ते १२ वर्षे वयोगटातील रुग्ण
वर्षभरात आढळलेले रुग्ण - १०४०
मागील सहा महिन्यांत आढळलेले रुग्ण - ६००
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण - ५०२७२
जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्ण - ४२५८९