सर्वोपचार रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:37 PM2019-09-21T12:37:17+5:302019-09-21T12:37:23+5:30
आंतरवासिता डॉक्टरला एका समाजसेवकाने शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी घडला.
अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्षात कार्यरत महिला आंतरवासिता डॉक्टरला एका समाजसेवकाने शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी घडला. याप्रकरणी महिला आंतरवासिता डॉक्टरने अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार दिली आहे. घटनेचे गांभीर्य पाहता अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाचा बहुतांश कारभार हा निवासी आणि आंतरवासिता डॉक्टरांच्या भरवशावर चालतो. रुग्णांची वाढती संख्या ही उपलब्ध डॉक्टरांच्या नियंत्रणापलीकडे आहे. अशातच काही लोकांकडून डॉक्टरांवर दबावतंत्र वापरण्याचा प्रकार नेहमीच दिसून येतो. असाच काहीसा प्रकार गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्षात घडला. अपघात कक्षात महिला आंतरवासिता डॉक्टर रुग्ण सेवा देत असताना एक समाजसेवक रुग्णाला घेऊन डॉक्टरांना भेटला अन् वादाला सुरुवात केली. शाब्दिक वाद सुरू असताना त्या समाजसेवकाने महिला डॉक्टरला मारण्याची धमकी दिली. डॉक्टर अन् समाजसेवकामधील हा वाद पेटल्याने संतप्त डॉक्टरांनी घटनेचा निषेध करीत अधिष्ठाता यांचे कार्यालय गाठले. यावेळी आंतरवासिता डॉक्टरांनी संबंधित समाजसेवकाविरुद्ध तक्रार दिली. अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असून, हे प्रकरण पोलिसांच्या हवाली करण्यात येत असल्याचे सांगितले.
अपघात कक्षात कार्यरत एका आंतरवासिता डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता, याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करीत आहोत. तसेच सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येणार आहे.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.