ग्रामस्थांची तहान ‘झिऱ्यां’वर!

By admin | Published: May 1, 2017 02:59 AM2017-05-01T02:59:42+5:302017-05-01T02:59:42+5:30

पाणी टंचाई : खारपाणपट्ट्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

Threats of the villagers on 'Jiriyan'! | ग्रामस्थांची तहान ‘झिऱ्यां’वर!

ग्रामस्थांची तहान ‘झिऱ्यां’वर!

Next

अकोला : तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा योजनांतर्गत १५ ते २० दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो, त्यातही काही गावांना पाणी मिळते. काही गावांपर्यंत पाणी पोहोचतच नाही, त्यामुळे नाल्यांमधील ‘झिऱ्यां’च्या दूषित पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.
जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात अकोला तालुक्यातील ६४ गावांना खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु योजनेंतर्गत गावांमध्ये सध्या १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रामुख्याने खारपाणपट्ट्यातील घुसर, खोबरखेड, मारोडी, आपोती बु., आपोती खुर्द, आपातापा, आखतवाडा, अनकवाडी, लाखोंडा बु., म्हातोडी, घुसरवाडी, कासली बु., केळीवेळी, दोनवाडा आणि किनखेड इत्यादी गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याची स्थिती आहे. नळांना पाणी आल्यानंतर ग्रामस्थांना पिण्याचे पाणी साठवून ठेवावे लागत आहे; मात्र वीस दिवस पुरेल एवढे पाणी साठविणे शक्य नसल्याने, सर्वसामान्य ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी काम-धंदा सोडून पायपीट करावी लागत आहे. खारपाणपट्टा असल्याने, गोड पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्याच्या स्थितीत ग्रामस्थांना नाल्यांमधील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. नाल्यांमधील ‘झिऱ्यां’वर पाणी भरण्यासाठी आणि गावापासून दोन-तीन कि.मी. अंतरावर हातपंपावरून पाणी भरण्यासाठी तापत्या उन्हाची पर्वा न करता गावांमधील महिला-पुरुषांना पायपीट करावी लागत आहे, तर काही गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेच्या ‘व्हॉल्व्ह’मधून वाहणाऱ्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत असून, काही गावांमध्ये पाण्याची ‘कॅन’ विकत घेऊन तहान भागविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

पाण्याविना टाक्या बिनकामाच्या
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी गावागावांत बांधण्यात आलेल्या टाक्यांमध्ये पाणीपुरवठा होत नाही. १५ ते २० दिवसांनंतर घरातील नळांना पाणीपुरवठा होतो; मात्र ज्यांच्या घरी नळ किंवा ज्या भागात पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहोचत नाही, अशा भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील बारुला भागात घुसर, आपोती व इतर गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात आलेल्या टाक्या पाण्याविना बिनकामाच्या ठरल्याचे वास्तव आढळून आले.

पाण्याअभावी लग्न बाहेरगावी करण्याची वेळ !
पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळांना १५ ते २० दिवसाआड पाणी येते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ‘झिऱ्या’तील पाण्याचा वापर करावा लागतो. रात्रंदिवस ‘झिऱ्या’वर काढावी लागते. त्यामुळे पाण्याअभावी मुला-मुलींचे लग्न पिण्याचे पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी बाहेरगावी नातेवाइकांकडे करण्याची वेळ खारपाणपट्ट्यातील ‘बारुला’ भागात ग्रामस्थांवर आल्याचे वास्तव आहे.

पाणी नाही; जनावरे मोकळे सोडण्याची आली वेळ !
माणसांना पिण्यासाठी पाणी नाही,तिथे जनावरांची तहान कशी भागविणार, असा प्रश्न निर्माण झाल्याने, तहान भागविण्यासाठी जनावरे मोकळे सोडण्याची वेळ आली आहे, असे मारोडी येथील ग्रामस्थांनी सांगितले.

पूर्णेचे पाणी पियायोग्य नाही
गावातून पूर्णा नदी वाहत असली, तरी नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ दोनवाडा येथील ग्रामस्थांवर आली आहे. गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोला नाल्यातील झिरे आणि गावापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या हिंगणी येथून बैलगाडी, मोटारसायकल, सायकलवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.

कपडे धुण्यासाठी नाल्यातील ‘झिऱ्या’ वर
पिण्यासाठी नळाचे पाणी मिळत नसल्याच्या स्थितीत म्हातोडी येथील महिलांना कपडे धुण्यासाठी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणार नाल्यातील ‘झिऱ्या’वर जावे लागत आहे. ‘झिऱ्या’तील हिरव्या घाण पाण्याचा कपडे धुण्यासाठी वापर करावा लागत आहे.‘झिऱ्या’तील पाणी कपडे धुण्यायोग्य नाही, पाण्याची दुर्गंधी येते; मात्र दुसरा पर्याय नसल्याने, या पाण्याचा कपडे धुण्यासाठी वापर करावा लागत असल्याची व्यथा म्हातोडी येथील सुनीता इंगळे, माला अवचार, मंदा इंगळे यांनी व्यक्त केली. नळांना किमान आठ दिवसातून पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: Threats of the villagers on 'Jiriyan'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.