हत्या प्रकरणातील तिघा आरोपींना रविवारपर्यंंत पोलीस कोठडी
By admin | Published: January 12, 2017 02:16 AM2017-01-12T02:16:32+5:302017-01-12T02:16:32+5:30
सातमैल येथील हत्याकांड; पोलिसांनी तिघांना केली अटक
अकोला, दि. ११- किरकोळ वादातून दोघा भावंडांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री सातमैल गावात घडली. उपचारादरम्यान रामेश्वर वाकोडे याचा मृत्यू झाला. प्राणघातक हल्ला व हत्येप्रकरणी जुने शहर पोलिसांनी आरोपी ओंकार नामदेव चव्हाण (५0), विक्रम ओंकार चव्हाण (१९) आणि सुनील रायसिंग सोळंके यांना रात्री अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना १५ जानेवारीपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आरोपी ओंकार चव्हाण याच्या घरी आरती नामक महिला पाहुणी म्हणून आली होती. तिने मृतक रामेश्वर वाकोडे, जखमी लक्ष्मण वाकोडे व त्याच्या पुतण्यास घरासमोर जाऊन शिवीगाळ केली. शिवीगाळ का, याचा जाब विचारण्यासाठी मृतक रामेश्वर, त्याचा चुलत भाऊ लक्ष्मण हे दोघे ओंकार चव्हाणच्या घरी गेले. या ठिकाणी त्यांच्यात वाद झाल्याने आरोपी ओंकार चव्हाण, विक्रम चव्हाण, सुनील सोळंके, आकाश चव्हाण यांनी कुर्हाड, चाकू व काठय़ांनी दोघांवर हल्ला चढविला. यात दोघेही भाऊ गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान रामेश्वर वाकोडे याचा मृत्यू झाला. जुने शहर पोलिसांनी चौघा आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३0२, ३0७ (३४) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास ओंकार चव्हाण, त्याचा मुलगा विक्रम व सुनील सोळंके यांना अटक केली.
एक आरोपी फरार आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघा आरोपींना १५ जानेवारीपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास एपीआय एच.एस. अळसपुरे करीत आहेत.