अकोल्यातील तीन खेळाडू करतील प्रथमच विमान प्रवास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 02:12 PM2020-01-05T14:12:51+5:302020-01-05T14:12:58+5:30
आता महाराष्ट्र शासनाने खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेकरिता जाण्यासाठी विमान प्रवासाची सोय केली आहे.
- नीलिमा शिंगणे-जगड
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: स्पर्धेसाठी खेळाडूंना करावयाचा प्रवास अत्यंत त्रासदायक. भारतीय रेल्वे आणि सरकारी बस हेच खेळाडूंना स्पर्धा ठिकाणी जाण्याचे साधन. राष्ट्रीय स्पर्धा असल्या तर या राज्यातून त्या राज्यात जाण्याकरिता दोन-तीन दिवसांचा प्रवास. प्रवासातच खेळाडू थकून जातात, याचा परिणाम खेळाडूंच्या खेळ कामगिरीवर होतो; परंतु आता महाराष्ट्र शासनाने खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेकरिता जाण्यासाठी विमान प्रवासाची सोय केली आहे. यामुळे निश्चितच खेळाडूंची कामगिरी उंचावणार आहे. अकोल्यातील खेळाडूंनादेखील यामुळे प्रथमच विमान प्रवास करण्याचे भाग्य लाभले आहे. बॉक्सर अजय पेंदोर, पूनम कैथवास आणि कबड्डीपटू सूरज पवार असे या भाग्यवंत खेळाडूंचे नाव आहे.
तिसऱ्या खेलो इंडिया युवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ९ ते २२ जानेवारी या कालावधीत गुवाहाटी (आसाम) येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत १७ ते २१ या वयोगटाचा समावेश आहे. स्पर्धेत महाराष्ट्राला अधिकाधिक पदके मिळून पदकतालिकेमधील प्रथम स्थान अबाधित राहावे, याकरिता शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे निवड चाचणी घेण्यात आली. राज्य संघात निवड झालेल्या खेळाडूंचे दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे. यानुसार राज्य संघ निवड चाचणी व स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिराकरितादेखील राज्य शासनाने खर्चाला मंजुरी दिली आहे. तसेच गुवाहाटी येथे सहभागी होणाºया खेळाडू, मार्गदर्शक तसेच संघ व्यवस्थापक यांना जाण्याचा पुणे ते गुवाहाटी विमान प्रवास, गुवाहाटी ते कोलकाता विमान प्रवास व कोलकाता ते पुणे रेल्वे प्रवास असा प्रवास करण्यास प्रतिव्यक्ती आठ हजार याप्रमाणे निधी उपलब्ध करू न देण्यात आला आहे. प्रशिक्षण शिबिर, हवाई प्रवास आदी बाबीकरिता शासनाने रुपये ८३,५५,२०० (रुपये त्र्याऐंशी लाख पंचावन्न हजार दोनशे) खर्चास मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे. अजय पेंदोर, पूनम कैथवास आणि सूरज पवार प्रथमच विमान प्रवास करीत आहेत. ‘स्वप्नातसुद्धा खरी न वाटणारी गोष्ट सत्यात घडणार’, असल्याने खूपच आनंद होत असल्याची प्रतिक्रिया या तिघांनी दिल्या. विमान प्रवास तर नावीन्याची गोष्ट आहेच; पण त्याआधी आम्ही खेळ कामगिरीवर लक्ष केंद्रित केले आहे, असेदेखील या तिघांनी निक्षून सांगितले. महाराष्ट्राचा कबड्डी संघ ७ जानेवारी रोजी तर बॉक्सिंग संघ १४ जानेवारी रोजी स्पर्धेकरिता रवाना होणार आहे.