४0 मातांसाठी तीन रुग्णवाहिका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:41 AM2017-08-17T01:41:34+5:302017-08-17T01:41:59+5:30
अकोला: जिल्हय़ातील गोर-गरीब आपल्या कुटुंबातील गरोदर महिलांना प्रसूतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल होण्यास प्राधान्य देत असले तरी, येथे आल्यावर त्यांना सुविधा कमी आणि हेलपाटेच अधिक घ्यावे लागतात. या रुग्णालयात प्रसूती झालेल्या मातांना त्यांच्या घरापासून रुग्णालयापर्यंत व तेथून त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका नसल्याने गरिबांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी गाड्या भाड्याने घ्याव्या लागत असल्याचे वास्तव आहे. रुग्णालयातून दररोज ४0 ते ४५ महिलांना ‘डिस्चार्ज’ दिला जातो. त्या तुलनेत रुग्णालयात शासनाच्या पाच रुग्णवाहिका असून, त्यापैकी दोन नादुरुस्त असल्याने आज रोजी केवळ तीन गाड्याच रुग्णसेवेत रुजू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

पूर्वाश्रमीच्या लेडी हार्डिंग्ज रुग्णालयाची ओळख आता जिल्हा स्त्री रुग्णालय अशी झाली आहे. खासगी दवाखान्यांमधील प्रसूतीचा खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने गरीब व काही अंशी मध्यमवर्गीय कुटुंबातील गरोदर महिला प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात येतात. या रुग्णालयात प्रसूतीसाठी येणार्या महिलांची संख्या अधिक असली, तरी त्या तुलनेत रुग्णालयातील खाटांची संख्या आणि इतर सुविधा तोकड्या पडत आहेत.
जननी सुरक्षा व जननी-शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गरोदर महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात आणणे व प्रसूतीपश्चात त्यांना घरापर्यंत पोहोचविण्यासाठी पाच रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे; परंतु गत काही दिवसांपासून या पाच रुग्णवाहिकांपैकी दोन नादुरुस्त आहेत.
त्यामुळे सध्या तीन रुग्णवाहिकांवरच रुग्ण महिलांना घेऊन जाण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या महिलांपैकी दररोज साधारणपणे ४0 ते ४५ महिलांना सुटी होते. एका रुग्णवाहिकेत एकावेळी एक रुग्ण व सोबत एक नातेवाईक अशा आठ जणांचीच वाहतूक करता येते. डिस्चार्ज होणार्या महिलांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णालयातील गाड्या तोकड्या पडत आहेत. त्यामुळे अनेकांना नाइलाजास्तव खासगी गाड्या भाड्याने घेऊन घर गाठावे लागते.
ग्रामीण भागासाठी केवळ दोन गाड्या
रुग्णालयात उपलब्ध असलेल्या पाच रुग्णवाहिकांपैकी दोन नादुरुस्त असल्याने सध्या केवळ तीन गाड्याच रुग्णसेवेत आहेत. यापैकी एक गाडी शहरासाठी असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी केवळ दोनच गाड्या उरतात. यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण महिलांना गाडी येईपर्यंत रुग्णालयातच वाट पाहत बसावे लागते.