जनता भाजी बाजारातून साडेतीन किलो गांजाचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 10:59 AM2021-04-14T10:59:51+5:302021-04-14T10:59:58+5:30
Cannabis seized in Akola : युवकावर पाळत ठेवून गांजा विक्री करीत असताना त्याला रंगेहाथ अटक केली.
अकोला : सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जनता भाजीबाजारात एका मुत्रीघराजवळ एक युवक गांजाची अवैधरीत्या विक्री करीत असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. या युवकाकडून सुमारे तीन किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला.
मोहम्मद अली रोडवरील रहिवासी फरदीन खान फिरोज खान हा जनता भाजीबाजारातील एका सरकारी मुत्रीघराजवळ प्रतिबंधित असलेल्या गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी सोमवारी रात्री उशिरा या परिसरात सापळा रचला, तसेच युवकावर पाळत ठेवून गांजा विक्री करीत असताना त्याला रंगेहाथ अटक केली. या युवकाकडून तीन किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. यासोबतच रोख रक्कम तीन हजार रुपये व ७८ हजार रुपये किमतीची एक दुचाकी असा एकूण एक लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली. या युवकाविरुद्ध सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांजा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनातील त्यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी काही दिवसांमध्ये गांजा विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गांजा जप्त केला. त्यानंतर शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जनता भाजीबाजार तसेच मोहम्मद अली रोड येथून गांजा जप्त केला आहे. हिवरखेड, तेल्हारा या ठिकाणावर कारवाई पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गांजा जप्तीची कारवाई केली आहे.