भरदिवसा तीन लाखांची घरफोडी
By admin | Published: October 27, 2016 03:37 AM2016-10-27T03:37:53+5:302016-10-27T03:37:53+5:30
अकोला जुने शहरातील घटना; ९0 ग्रॅम सोन्यासह रोख पळविली!
अकोला, दि. २६- जुने शहरातील गोडबोले प्लॉट येथील शिक्षकाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी बुधवारी दुपारी भरदिवसा धिंगाणा घालत तब्बल दोन लाख ५0 हजार रुपयांचे ९0 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३0 हजार रुपये रोख लंपास केल्याची घटना घडली. खंडेलवाल शाळेजवळ दीपक माहोरे व विद्या माहोरे यांचे विद्यादीप नावाचे टोलेजंग निवासस्थान आहे. दीपक माहोरे आणि विद्या माहोरे दोघेही जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते दोघेही बुधवारी नेहमीप्रमाणे शाळेवर शिकविण्यासाठी गेल्यानंतर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी त्यांच्या घरात पाठीमागून असलेल्या सर्व्हिस लाइनमधून प्रवेश केला. घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घराच्या प्रत्येक खोलीत त्यांनी धिंगाणा घातला. खंडेलवाल महाविद्यालयासमोर हा प्रकार सुरू असतानाही कुणालाही शंका आली नाही. शेकडो विद्यार्थ्यांची या ठिकाणी रेलचेल असते; मात्र चोरट्यांनी समोरील दरवाजा उघडा ठेवून हा प्रताप केल्याने कुणालाही शंका आली नाही. या चोरट्यांनी खोलीमधील क पाटातून रोख २३ हजार ५00 रुपये आणि तब्बल दोन लाख रुपयांचे ९0 ग्रॅम सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला. माहोरे दाम्पत्य सायंकाळी घरी आले असता, त्यांना प्रवेशद्वार उघडे दिसले. यामुळे दोघेही अचंब्यात पडले. त्यांनी या प्रकाराची माहिती डाबकी रोड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच श्वान पथक व ठसे तज्ज्ञ पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने डाबकी रोडपर्यंत दिशा दर्शविली; मात्र त्यापुढे श्वान गेला नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.