क्रिकेट सामन्यावर सट्टाबाजी करणारे तिघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 10:39 AM2021-05-03T10:39:02+5:302021-05-03T10:39:14+5:30
Three arested for cricket betting : अकोट फाईलमधील तिघांना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले.
अकोला : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्या दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्ट्याची देवाण-घेवाण करणाऱ्या अकोट फाईलमधील तिघांना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून टी. व्ही., मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली.
अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी शेख नफीस शेख मुसा, गुलाम फारुख गुलाम नूर व शैलेश तुलचंद मेश्राम (सर्व रा. अकोट फाईल) हे तिघेजण याच परिसरात असलेल्या सुपर फाईन टेलर या दुकानामधून आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा बाजार चालवत असल्याची माहिती शहर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी पाळत ठेवून अकोट फाईल आतील सुपर फाईन टेलर या दुकानावर छापा टाकला. त्यानंतर या ठिकाणावरून टी. व्ही., मोबाईलच्या साहाय्याने सट्टा लावण्यासाठीचे यंत्र, एक रिमोट, तसेच रोख रक्कम असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांविरुद्ध अकोट फाईल पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.