अकोटात युवकाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:19 AM2021-04-23T04:19:54+5:302021-04-23T04:19:54+5:30
स्थानिक अक्सा अपार्टमेंटजवळ २१ एप्रिल रोजी रात्री १० वाजता अब्दुल सलमान अब्दुल राजिक (वय २७) याच्या छातीवर व दंडावर ...
स्थानिक अक्सा अपार्टमेंटजवळ २१ एप्रिल रोजी रात्री १० वाजता अब्दुल सलमान अब्दुल राजिक (वय २७) याच्या छातीवर व दंडावर आरोपी मतीन अली जामीन अली याने चाकूने वार केले, तर आरोपी अहमद अली मोहमद अली, मुसद्दिक अली मुकतारअली यांनी मृतकाला पकडून ठेवले होते. या गंभीर घटनेत अब्दुल सलमान अब्दुल राजिक हा रक्ताच्या थोराळ्यात खाली पडला. काही लोकांनी त्याला जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच, शहर पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली. मागीलवर्षी या परिसरात रमजान महिना संपताच २७ मे २०२० रोजी दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली होती. त्यामध्ये सय्यद मुद्दसीर अली सय्यद मुक्तार अली (वय २६ वर्षे, धारोळी वेस, अकोट) याची हत्या झाली होती. या हत्याकांडात मृतक अब्दुल सलमान अब्दुल राजिक हा आरोपी होता. नुकताच सलमान हा जामिनावर बाहेर आला होता. २१ एप्रिल रोजी त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी मतीन अली जामीन अली, अहमद अली मोहमद अली, मुसद्दिक अली मुकतारअली (रा. धारोळी वेस, अकोट) यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे ॲड. जयकृष्ण गावंडे यांनी, तर आरोपीतर्फे अंजूम काझी यांनी काम पाहिले. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पाचपोर करीत आहेत.