शेतकरी आत्महत्यांची तीन प्रकरणे मदतीसाठी पात्र
By Admin | Published: September 8, 2015 02:24 AM2015-09-08T02:24:18+5:302015-09-08T02:24:18+5:30
अकोला जिल्हास्तरीय समितीची बैठकीत तीन प्रकरणे पात्र तर ११ प्रकरणात फेरचौकशीचे निर्देश.
अकोला: शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये मदत देण्याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची तीन प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, ११ प्रकरणांमध्ये फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. शेतकरी आत्महत्या प्रकरणात मदत देण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत एकूण १४ शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी मूर्तिजापूर तालुक्यातील मलकापूर येथील मारोती निंबाजी शिंदे, बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबळ येथील राजेश प्रकाश वानखडे, पातूर तालुक्यातील सुकळी येथील कैलास भीमराव माळी इत्यादी तीन शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. उर्वरित ११ शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये फेरचौकशी करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये महादेव मनू राठोड (गौलखेडी), गजानन जनार्दन राऊत (माना), भानुदास सीताराम डिके (मंगरुळ कांबे), दत्तात्रय गणेश रावणकर (लवाडी), शकिलोद्दीन ग्यासोद्दीन (हिवरखेड), बाळकृष्ण श्रीराम खंडारे (पुनोती), महादेव परशराम नांदे (जांभरुण), लता गजानन मोरखडे (मोरझाडी), गजानन दादाराव चौधरी (मंचनपूर), डिगांबर जगदेव तराळे (आपोती) व नीलेश प्रभुलाल सहगल (दहीहांडा) इत्यादी ११ शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये फेरचौकशीचे निर्देश देण्यात आले. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला समितीचे सदस्य माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्यासह पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इत्यादी कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून अधिकारी उपस्थित होते.