गोठ्याला भीषण आग; तीन गुरांचा भाजल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 06:24 PM2019-02-11T18:24:37+5:302019-02-11T18:24:42+5:30
देगाव : येथील एका शेतकऱ्याच्या गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री घडली. या आगीत गोठ्यात बांधलेली तीन गुरे भाजल्याने ठार झाली;
देगाव : येथील एका शेतकऱ्याच्या गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री घडली. या आगीत गोठ्यात बांधलेली तीन गुरे भाजल्याने ठार झाली; तसेच गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने शेतकºयाचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीची घटना वेळीच निदर्शनास आल्यावर त्यावर नियंत्रण मिळवता आले.
देगाव येथील माणिकराव जगदेव शेगोकार यांचा गावामध्ये गुरांचा गोठा आहे. या गोठ्याला रविवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत गोठ्यात बांधलेले दोन बैल व एक वासरू भाजल्या गेल्याने ठार झाले; तसेच गोठ्यात ठेवलेले स्प्रिंकलर पाइप, गुरांचा चारा तसेच इतर साहित्य जळून खाक झाल्याने शेगोकार यांचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. घरकुलच्या कामासाठी आलेल्या ग्रामस्थांना गोठ्यात लागलेली आग दिसल्याने त्यांनी तातडीने तिथे धाव घेतली; तसेच यावेळी आवाजाने जाग आलेल्या ग्रामस्थांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. या गोठ्याच्या आजुबाजूला घरे आहेत. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने या घरांपर्यंत आग पोहोचली नाही. माहिती मिळताच वाडेगाव चौकीच्या पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन नुकसानाचा पंचनामा केला; तसेच तलाठी, पोलीस पाटील व कृषी सहायक यांनीही गोठ्याला भेट देऊन पाहणी केली. शेगोकार यांचे या आगीत मोठे नुकसान झाल्याने त्यांना शासनाने मदत देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)