किनखेड येथे आगीत तीन गोठे जळाले!
By admin | Published: May 8, 2017 02:35 AM2017-05-08T02:35:31+5:302017-05-08T02:35:31+5:30
तीन शेतक-यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान.
सायखेड : नजीकच्या किनखेड येथे ६ मे रोजी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत तीन गोठे भस्मसात झाले. या आगीत तीन शेतकर्यांचे शेतीपोयोगी साहित्य जळून तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
किनखेड येथील विश्वास रामचंद्र आंधळे, उमराव रामचंद्र आंधळे व बबन रामचंद्र आंधळे या तीन भावांचे शेती साहित्य व कुटार साठविण्यासाठी बांधलेले गोठे गावाला लागूनच आहेत. शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गोठय़ात ठेवलेले २७0 स्प्रिंक्लर पाइपसह अन्य शेतीपोयोगी साहित्य जळाले. ही आग विझविण्यात अग्निशामक दलाला रात्री उशिरा यश आले. या आगीची माहिती मिळाल्यानंतर बाश्रीटाकळीचे तहसीलदार रवी काळे, निवासी नायब तहसीलदार अतुल पाटोळे, ठाणेदार सतीश पाटील, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील धाबेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तहसीलदार रवी काळे व सुनील धाबेकर रात्रभर तेथेच थांबले होते. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गावातील पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेता कृषी पंपांचा वापर करणे गरजेचे होते; परंतु कृषी पंपांचा विद्युत पुरवठा रात्री बंद असल्याने अडचण येत होती. या बाबीची दखल घेऊन महान विद्युत वितरण केंद्राच्या अभियंत्यांनी गावठान फिडरचा विद्युत पुरवठा त्वरित बंद करून कृषी पंपांचा विद्युत पुरवठा सुरू केला. त्यामुळे शेतातील विहिरीवरील मोटारपंप सुरू झाल्याने त्यांचा आग विझविण्यासाठी वापर करता आला. या विहिरीतील पाणी संपताच अग्निशामक दलाची गाडी पोहोचल्याने आग विझविण्यात यश मिळाले.