इलेक्ट्रीकल वाहनांसाठीच्या विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ

By Atul.jaiswal | Published: August 21, 2023 05:47 PM2023-08-21T17:47:31+5:302023-08-21T17:48:10+5:30

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण रक्षणासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याची सूचना केली आहे

Three-fold increase in sales of electricity for electric vehicles in ten months | इलेक्ट्रीकल वाहनांसाठीच्या विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ

इलेक्ट्रीकल वाहनांसाठीच्या विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ

googlenewsNext

अकोला : राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी विजेची विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ महिन्यातील ४.५६ दशलक्ष युनिटवरून वाढून जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली असून विजविक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ झाली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेशचंद्र यांनी दिली.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण रक्षणासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याची सूचना केली आहे. महावितरण ही महाराष्ट्रासाठी विद्युत वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी नोडल एजन्सी आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी महावितरणच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन उभारणे अथवा खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीस मदत करणे, विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी मदत करण्याच्या दृष्टीने मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करणे, विद्युत वाहनांसाठी धोरणात्मक निर्णयास सरकारला मदत करणे अशी विविध कामे महावितरणकडून केली जातात.

राज्यात महावितरणची आणि खासगी अशी एकूण ३२१४ चार्जिंग स्टेशन आहेत. त्या माध्यमातून वाहनांसाठी झालेली विजेची विक्री ध्यानात घेतली तर वेगाने वाढ झालेली दिसते. वाहनांसाठी सप्टेंबर २०२२ मध्ये राज्यात ४.५६ दशलक्ष युनिट विजविक्री झाली होती, मार्च २०२३ मध्ये ही विक्री ६.१० दशलक्ष युनिट झाली तर जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट विजेची विक्री झाली.

राज्यातील विद्युत वाहनांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. २०१८ साली राज्यात ४,६४३ विद्युत वाहनांची विक्री झाली होती तर २०२२ साली १,८९,६९८ विद्युत वाहनांची विक्री झाली होती. राज्यात ३१ मार्च २०२३ अखेर एकूण विद्युत वाहनांची संख्या २,९८,८३८ झाली आहे. या सुमारे तीन लाख विद्युत वाहनांमध्ये दुचाकी वाहनांची संख्या अडीच लाख आहे. विजेवर चालणाऱ्या बसेसची संख्या राज्यात झपाट्याने वाढली आहे. राज्यात २०१८ साली केवळ चार विद्युत बसेसची नोंदणी झाली होती. २०२२ साली ही संख्या ३३६ झाली. मार्च २०२३ अखेर राज्यात एकूण १३९९ विद्युत बसेस होत्या.

किफायतशीर प्रवास

विद्युत वाहनांमुळे पर्यावरण रक्षणाला मदत करण्यासोबतच पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होते. पेट्रोलवर चालणाऱ्या पारंपरिक दुचाकी वाहनाला इंधनाचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे २ रुपये १२ पैसे येतो तर विद्युत दुचाकीला प्रति किलोमीटर ५४ पैसे खर्च येतो. पेट्रोलियमवर चालणाऱ्या चार चाकी वाहनाला प्रति किलोमीटर सुमारे ७ रुपये ५७ पैसे खर्च येतो तर विद्युत चार चाकीला प्रति किलोमीटर १ रुपया ५१ पैसे खर्च येतो. तीनचाकी गाडीचा प्रति किलोमीटरचा खर्चही पेट्रोलियमसाठी सुमारे ३ रुपये २ पैसे तर विजेसाठी ५९ पैसे आहे.

Web Title: Three-fold increase in sales of electricity for electric vehicles in ten months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.