एकाच कुटुंबातील तीन ते चार लोकांना मिळाले शौचालय
By admin | Published: June 25, 2017 08:28 AM2017-06-25T08:28:55+5:302017-06-25T08:28:55+5:30
काही ग्रामस्थांनी सेप्टी टँकचे शौचालय बांधलेले असतानासुद्धा त्यांना लाभ देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वल्लभनगर: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अकोला तालुक्यातील निंभोरा गावामध्ये वैयक्तिक शौचालयाचा आॅनलाइन यादीप्रमाणे १९५ लाभार्थींनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. या यादीप्रमाणे एकाच कुटुंबातील ३ ते ४ लोकांना लाभ दिल्याचा दिसत आहे. तसेच यादीमध्ये पूर्वी काही ग्रामस्थांनी सेप्टी टँकचे शौचालय बांधलेले असतानासुद्धा त्यांना लाभ देण्यात आला आहे. तसेच शौचालये बांधण्यात आलेली असली तरी त्याचा वापर होत नसल्याचे चित्र आहे. शौचालयाचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
१० ते १५ शौचालयांना शोषखड्डे बांधलेले नाही. काही शौचालयच बांधलेले आहेत. त्याचा वापर होत नसल्याचे दिसत आहे. काहींनी तर बांधकाम न करताच निधी हडप केलेला आहे. गाव हगणदरीमुक्त कागदोपत्री झाल्याचे दिसत आहे आणि ग्रामस्थ गावाच्या दर्शनी रस्त्याच्या कडेला उघड्यावर शौचास करीत आहे.
अशी मोहीम शासनाकडून राबविल्या गेल्यास शासनाच्या निधीला हरताळ फासल्यासारखे होत आहे. अशा बोगस लाभार्थींवर कारवाईची मागणी निंभोरा येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे रेटून धरली आहे. याबाबत गटविकास अधिकारी गजानन वेले यांना विचारणा केली असता चौकशी करू, नंतर कारवाई करू, असे सांगितले. (वार्ताहर)
शौचालयांचे वाटप हे माझ्या कार्यकाळात झालेले नाही. वरिष्ठांनी आदेश दिल्यास शौचालय वाटपाची चौकशी करू.
- डिगांबर टिकार,
प्रभारी ग्रामसेवक, निंभोरा