विद्यार्थ्यांवर दृष्टिदोषाचे संकट; चार महिन्यांत तीनशेच्यावर मुलांमध्ये दृष्टिदोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 03:17 PM2018-11-16T15:17:52+5:302018-11-16T15:18:20+5:30

अकोला : दृष्टिदोष हा केवळ प्रौढांमध्येच नव्हे, तर शाळकरी मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जुलै ते आॅक्टोबर दरम्यान झालेल्या तपासणी मोहिमेतून हे वास्तव समोर आले आहे.

three hundred children have vision blindness | विद्यार्थ्यांवर दृष्टिदोषाचे संकट; चार महिन्यांत तीनशेच्यावर मुलांमध्ये दृष्टिदोष

विद्यार्थ्यांवर दृष्टिदोषाचे संकट; चार महिन्यांत तीनशेच्यावर मुलांमध्ये दृष्टिदोष

Next

- प्रवीण खेते
अकोला : दृष्टिदोष हा केवळ प्रौढांमध्येच नव्हे, तर शाळकरी मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जुलै ते आॅक्टोबर दरम्यान झालेल्या तपासणी मोहिमेतून हे वास्तव समोर आले आहे. जुलै ते आॅक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ३३९ विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष आढळून आला आहे. त्यामुळे पालकांनो, वेळीच सावध व्हा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
वाढत्या वयासोबतच दृष्टिदोषाची समस्या उद्भवू लागते. हे नैसर्गिक असले, तरी हल्ली झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे लहान मुलांमध्येही दृष्टिदोषाचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांचे बिघडलेले खानपान अन् तासंतास मोबाइल, व्हिडिओ गेम्सवर असल्याने ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू लागली आहे. लहान वयातच मुलांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे वेळीच निवारण व्हावे, या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी केली जाते. त्यांतर्गत जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील ९६ शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ही तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. कार्यक्रमांतर्गत या चार महिन्यांत ३३९ विद्यार्थ्यांना दृष्टिदोष असल्याचे आढळून आले.

रंग अंधत्वाची तपासणीच नाही!
रंग अंधत्वाचे प्रमाण कमी असले, तरी त्याची तपासणीही आवश्यक आहे; परंतु या उपक्रमांतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांची रंग अंधत्वाची तपासणीच केली जात नाही.

तिरळेपणाचेही लक्षण
तपासणीदरम्यान लहान मुलांमध्ये दृष्टी कमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यासोबतच तिरळेपणाची समस्याही वाढत आहे. उपक्रमांतर्गत गतवर्षी काही रुग्णांवर वर्धा येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

जेवणात याचा समावेश करा!
हिरव्या पालेभाज्या
फळं
अंडी
मच्छी

पालकांची जबाबदारी
खानपानासोबतच मुलांच्या जीवनशैलीवरदेखील विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे पालकांनी आपली जबाबदारी ओळखून मुलांच्या हाती जास्त वेळ मोबाइल देणे टाळावे, फास्ट फुडपेक्षा पालेभाज्या द्या, अभ्यास करताना मुले चुकीच्या पद्धतीने बसत असतील, तर ती तत्काळ बदला, मुलांकडून नियमित व्यायाम करून घ्यावा.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राबविलेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष आढळून आले. पालकांनी विशेष खबरदारी घेतल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते.
- डॉ. एम. राठोड, आरएमओ, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अकोला.

 

Web Title: three hundred children have vision blindness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.