राष्ट्रीय महामार्गावरील दोन अपघातांमध्ये तीन ठार
By Admin | Published: February 8, 2016 02:22 AM2016-02-08T02:22:12+5:302016-02-08T02:22:12+5:30
खामगाव व नांदु-यानजीक घडले अपघात.
खामगाव/नांदुरा: राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा आणि खामगावनजीक झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. यातील पहिला अपघात टेंभुर्णा फाट्यानजीक ६ फेब्रुवारीला रात्री घडला तर दुसरा अपघात सात फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहा वाजता नांदुर्यानजीक घडला. पहिल्या अपघातामध्ये वाशिम जिल्ह्यातील दोघे जण ठार झाले. बबलू सूर्यवंशी व रतन किसन सूर्यवंशी हे दुचाकीने अकोल्याकडे जात होते. दरम्यान, अकोला मार्गावर अमरलीला ढाब्यानजीक अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दोघेही दुचाकीस्वार ठार झाले. हा अपघात टेंभुर्णा फाट्यानजीक ६ फेब्रुवारीला रात्री घडला. या प्रकरणी शामराव गोविंदराव सूर्यवंशी (रा. खुपसा, जि. वाशिम) यांनी खामगाव ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला . आयशरला अपघात दुसरा अपघात हा नांदुर्यानजीक खरेदी-विक्री संस्थेजवळ राष्ट्रीय महामार्गवर ७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहा वाजता घडला. यामध्ये आयशर क्रमांक एमएच-१५-सीके-८२८८ चा क्लिनर बंटी हनुमंत भामरे (रा. मेहरगाव, ता. जि. धुळे) हा गाडीखाली दबल्याने ठार झाला तर आयशर चालक प्रमोद साहेबराव देवरे हा (रा. मेहरगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर नांदुर्यानजीक वाहनचालकाचा वाहनाचे टायर फुटल्याने वाहनावरील ताबा सुटल्याने बालाजी बिछायत केंद्रासमोर जाऊन आशयर उलटला. मार्गावरील नागरिकांनाही क्षणभर काहीच समजले नाही. या अपघातामध्ये बिछायत केंद्रासमोर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्यांचे नुकसान झाले. ट्रकमधील जखमी चालकास नागरिकांनी प्रयत्नपूर्वक बाहेर काढले.