महापालिका हद्दवाढीसाठी अवघा तीन महिन्यांचा अवधी
By admin | Published: February 17, 2016 02:24 AM2016-02-17T02:24:57+5:302016-02-17T02:24:57+5:30
हद्दवाढीची प्रक्रिया १ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निवडणूक आयुक्तांचे निर्देश.
अकोला: महापालिकेच्या हद्दवाढीसाठी १ जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी मनपा आयुक्तांना दिले. त्यानंतर कोणत्याही प्रस्तावाचा विचार केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेमुळे अकोला मनपासमोर हद्दवाढीच्या प्रक्रि येसाठी अवघ्या तीन महिन्यांचा अवधी शिल्लक असून, हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एवढा अवधी पुरेशा नसल्याने आता हद्दीवाढीचा प्रश्न मागे पडण्याची शक्यता आहे. अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेतला. येत्या वर्षभरानंतर राज्यभरातील दहा महापालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम पार पडेल. यामध्ये अकोला मनपाचा समावेश आहे. १७ फेब्रुवारी २0१२ रोजी अकोला मनपाची निवडणूक पार पडली होती. फेब्रुवारी २0१७ मध्ये पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात येत आहे. या मुद्दय़ावर राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आढावा घेतला. महापालिकांच्या प्रस्तावित हद्दवाढीसाठी त्यांनी १ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. १ जूनपर्यंत हद्दवाढीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच संबंधित मनपाच्या प्रस्तावाचा विचार केला जाईल. त्यानंतर मात्र हा विषय प्रलंबित राहण्याचे संकेत त्यांनी दिले. प्रभाग रचनेच्या विषयावर मात्र त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही.