अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात आणखी तीन महिला गजाआड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:51 PM2019-12-23T12:51:39+5:302019-12-23T12:51:49+5:30
मुलीची चौकशी केली असता, तिने रमाबाई साहेबराव मोरे, गोकुळा ऊर्फ कोकी राजेश मोरे आणि वर्षा राजीक खान, योगेश श्रीराम बांगर (रा. लक्झरी बायपास) यांनी तिला ब्रिजेश गोकुळचंद शर्मा यांच्या माध्यमातून विनोद शर्मा याला विकले.
अकोला: शहरातील एका १४ वर्षीय मुलीची जयपूर येथे विक्री करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात खदान पोलिसांनी आणखी तीन महिलांना रविवारी अटक केली. यातील दोघा आरोपींना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरातील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिची १४ वर्षांची मुलगी २६ जानेवारी २0१९ रोजी झेंडावंदन करण्यासाठी शाळेत गेली; परंतु ती घरी परतली नाही. त्यामुळे महिलेने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर आरोपी तब्बू ऊर्फ मनीषा सादीक चौधरी (मनीषा विष्णू वानखडे (२५ रा. शंकर नगर अकोट फैल) हिला अटक केली. तिने आठ महिन्यांपूर्वी रात्रीच्या सुमारास रमाबाई साहेबराव मोरे (रा. अण्णाभाऊ साठे नगर अकोट फैल), गोकुळा राजेश मोरे, वर्षा गवई ऊर्फ वर्षा राजीक खान (रा. वाशिम बायपास), दुर्गा योगेश बांगर, योगेश बांगर यांनी विनोद दयालशंकर शर्मा (२८ रा. खोरालाडखानी जयपूर (राजस्थान) याला ६0 हजार रुपयांमध्ये विकले आणि तिचे त्याच्यासोबत लग्न लावून दिले. पोलिसांनी आरोपींसह राजस्थानला जाऊन मुलीचा शोध घेतला. मुलगी आढळून आली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन आरोपी विनोद दयालशंकर शर्मा याला २१ डिसेंबर रोजी अटक केली. त्यानंतर मुलीची चौकशी केली असता, तिने रमाबाई साहेबराव मोरे, गोकुळा ऊर्फ कोकी राजेश मोरे आणि वर्षा राजीक खान, योगेश श्रीराम बांगर (रा. लक्झरी बायपास) यांनी तिला ब्रिजेश गोकुळचंद शर्मा यांच्या माध्यमातून विनोद शर्मा याला विकले. त्यानंतर विनोद शर्मा याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम ३६८, ३७0, ३७0(अ), ३७६,(२), १२0(ब), आरडब्लू ४, ५(एल), ६ पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. खदान पोलिसांनी गोकुळा ऊर्फ कोकी राजू मोरे (३२ रा. लक्झरी बायपास), वैशाली ऊर्फ वर्षा दयाराम वानखडे (शाहिस्ता राजीक खान), उषा ऊर्फ रमाबाई साहेबराव मोरे (६0 रा. अकोट फैल) यांना रविवारी अटक केली. आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)