‘कोरोना’च्या सावटातही अधिपरिचारिकांना निवासस्थान खाली करण्याचे आदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 10:25 AM2020-03-28T10:25:38+5:302020-03-28T10:27:18+5:30
तीन अधिपरिचारिकांचे कुटुंब रस्त्यावर आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देशभरात कोरोनाची संचारबंदी असताना अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या एका आदेशाने तीन अधिपरिचारिकांचे कुटुंब रस्त्यावर आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला आहे, तर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने शहरात कोणी भाड्याने घरही देत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
गोरक्षण रोडस्थित नेहरू पार्क समोर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. जवळपास सहा ते सात वर्षांपूर्वी तत्कालीन अधिष्ठाता बोभाटे यांनी मनीषा इंगोले, चंदा भागवत आणि ममता डोंगरदिवे (शहा) या तिन्ही अधिपरिचारिकांना निवासस्थान उपलब्ध करून दिले होते. डॉक्टर मागणी करतील त्यावेळेस निवासस्थान रिक्त करून देणार असल्याचे लिहून दिले होते; परंतु हे निवासस्थान वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांसाठी असून, चुकीच्या पद्धतीने वर्ग तीनच्या कर्मचाºयांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी तिन्ही अधिपरिचारिकांना निवासस्थान रिक्त करण्याचा आदेश दिला आहे. शिवाय, कोरोनाच्या पृष्ठभूमीवर अत्यावश्यक सेवा म्हणून औषधवैद्यकशास्त्र व शल्यचिकित्साशास्त्र विषयातील अध्यापकांना हे निवासस्थान दिले जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
...तर इतरांसाठी कायदा का नाही?
संचारबंदी असताना नियमबाह्य बाब म्हणून निवासस्थान खाली करण्याचा आदेश दिला जातो; पण ग्रंथपाल यांच्यासह अधिष्ठातांच्या वाहन चालकांसाठी हा कायदा लागू होत नाही का, असा सवाल यावेळी बेघर झालेल्या अधिपरिचारिकांनी उपस्थित केला.
बदलीनंतरही ‘ते’ कुटुंब निवास्थानातच!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील काही अधिकारी, कर्मचाºयांची बदली इतर जिल्ह्यांमध्ये झाली आहे. असे असतानाही काही कुटुंब येथील निवासस्थानाचा उपभोग घेत असल्याची माहिती आहे.
ती निवासस्थाने डॉक्टरांसाठी आहेत. त्यामुळे संबंधित अधिपरिचारिकांना निवासस्थान रिक्त करण्याचा आदेश दिला. शिवाय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील वर्ग-३ कर्मचाºयांच्या निवासस्थानी त्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात आली; परंतु ते जाण्यास नकार देत आहेत.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.