भरधाव लक्झरी बसची दुचाकीला धडक; मायलेकांसह तीन जागीच ठार, जमावाने बस पेटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 02:18 PM2019-01-23T14:18:29+5:302019-01-23T15:17:06+5:30
बार्शीटाकळी (अकोला) : भरधाव जात असलेल्या लक्झरी बसने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील मायलेकांसह तीन जण ठार झाल्याची घटना अकोला ते मंगरुळपीर मार्गावरील दगडपारवा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)जवळ बुधवारी दुपारी दीड वाजताचे सुमारास घडली.
बार्शीटाकळी (अकोला) : भरधाव जात असलेल्या लक्झरी बसने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील मायलेकांसह तीन जण ठार झाल्याची घटना अकोला ते मंगरुळपीर मार्गावरील दगडपारवा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)जवळ बुधवारी दुपारी दीड वाजताचे सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लक्झरी बसची तोडफोड करून पेटवून दिली.
खासगी प्रवासी वाहतुक करणारी बस (एम.एच. ३७ बी. ६९४९) अकोला येथून मंगरुळपीरकडे जात होती.त्याचवेळी दगडपारवा येथून एम.एच. ३० - एडब्ल्यू ७८५१ क्रमांकाच्या दुचाकीवर दगडपारवा येथील तीघे जण बार्शीटाकळीच्या दिशेने जात होते. या खासगी बसने बार्शीटाकळी व दगडपारवा गावाच्या दरम्यान असलेल्या आयटीआय जवळ विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, यामध्ये दुचाकीवरील अनुराधा प्रकाश राठोड, नितीन प्रकाश राठोड (दोघेही रा. दगडपारवा) व अस्मिता पवार (१४, रा. दहातोंडा, ता. मूर्तीजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दगडपारवा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी खासगी बसची तोडफोड केली. ग्रामस्थ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बस पेटवून दिली. घटनेची माहिती समजताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला. जमावाचे उग्र पाहता पोलिसांनी अकोल्याहून अतिरिक्त कुमक बोलावली.