वीज पडून मायलेकीसह तीन ठार, चार जण जखमी
By admin | Published: October 3, 2015 02:40 AM2015-10-03T02:40:21+5:302015-10-03T02:40:21+5:30
परतीच्या पावसाची अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, तर वाशिम जिल्ह्यात दमदार हजेरी.
अकोला : परतीच्या पावसाने अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, तर वाशिम जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात वीज कोसळून मायलेकीसह तीन जण ठार, तर चार जण जखमी झाले. वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. रिसोड तालुक्यातील किनखेडा येथील राजेश पांडूरंग देशमुख यांच्या शेतात सोयाबिन काढणीचे काम सुरू झाल्याने, अचानक पावसाला सुरूवात झाल्याने, शेत मालक व पाच मजूर शेतातीलच झाडाखाली छत्री घेवून उभे होते. त्याचवेळी झाडावर वीज कोसळली. या झाडाखाली किनखेडा येथील संगीता राजेश देशमुख (वय ४५), रितेश राजेश देशमुख (वय १३), दुर्गा किसन अवचार (वय ५५) आणि पेडगाव येथील रूपाली मोहन अंभोरे (वय १२) व उज्वला मोहन अंभोरे (वय ४५), रचना राजू तुरूकमाने (वय ३0) हे सहा जण उभे होते. त्यापैकी उज्वला मोहन अंभोरे आणि त्यांची मुलगी रचना राजू तुरूकमाने यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले. सर्वांना रिसोड येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी दोघींना मृत घोषित केले. चार जखमींवर वाशिम येथे उपचार सुरू आहेत. रचना राजू तुरूकमाने ही मेहकर तालुक्यातील परतापूर येथील रहिवासी असून, ती पेडगाव येथे माहेरी आली होती. ती आईसोबत शेतात मजुरीला गेली असता, दोघींचाही वीज पडल्याने मृत्यू झाला. वीज कोसळून एका शेतकर्याचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथे दुपारी घडली. अडोळी येथील शेतकरी रामदास तुकाराम इढोळे (वय ४५) हे शेतात सोयाबिन काढणीचे काम करीत असताना, दुपारी ४ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतातील मजूर कुटाराच्या ढिगाजवळ जावून उभे राहीले, तर रामदास इढोळे यांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. त्याचवेळी वीज पडल्याने इढोळे यांचा मृत्यू झाला.