विद्युत खांबावर शॉक लागून मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:14 AM2021-06-28T04:14:47+5:302021-06-28T04:14:47+5:30
तेल्हारा : तालुक्यातील पाथर्डी शेत शिवारातील विद्युत खांबावर काम करताना रविवार, २० जून रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास विजेचा ...
तेल्हारा : तालुक्यातील पाथर्डी शेत शिवारातील विद्युत खांबावर काम करताना रविवार, २० जून रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात २५ जून रोजी मृताच्या थोरल्या भावाने तेल्हारा पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील पाथर्डी येथील रहिवासी गुरुदेव दत्तात्रय इसमोरे (३७) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा लहान भाऊ मृत नितीन दत्तात्रय इसमोरे (३३) हा गावातील लाइनमन राजकुमार कासदे यांच्या सांगण्यानुसार काम करीत होता. त्याने अकोट एमएसईबीमध्ये बाह्य साहाय्यक टेक्निशियन म्हणून सन २०१८-१९ मध्ये काम केले. त्यानंतर सन २०२० मध्ये कामावरून काढून टाकले. तेव्हापासून तो लाइनमन कासदे यांच्या हाताखाली काम करीत होता. घटनेच्या दिवशी २० जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ नितीन इसमोरे यास वायरमन यांनी फोन करून गोवर्धन वाघ (रा. पाथर्डी) व दिलीप कुकडे (रा. राणेगाव) यांच्या शेतातील लाइनचा फॉल्ट काढून देण्यास सांगितले. याबाबत नितीनने आईला सांगितले. त्यानंतर मृत नितीनने गावानजीकच्या विद्युत रोहित्राचा वीजपुरवठा खंडित केला व विद्युत खांबावर चढला. काम करीत असता विजेचा शॉक लागून त्याचा खांबावरच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस अकोट दक्षिण खेडे वितरण केंद्र तंत्रज्ञ वायरमन राजकुमार कासदे, गोवर्धन वाघ, दिलीप कुकडे जबाबदार आहेत, असा आरोप फिर्यादी गुरुदेव इसमोरे यांनी तक्रारीतून केला. या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी २५ जून रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे, हेडकॉन्स्टेबल जगदीश पुंडकर, पोलीस कॉन्स्टेबल सतीश भटकर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.