पिंपळडोळी येथील वन विभागाच्या तीन क्वॉर्टर, विश्रामगृहात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:22 AM2021-08-26T04:22:08+5:302021-08-26T04:22:08+5:30
पांढुर्णा: चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातूर तालुक्यातील आलेगाव वन परिक्षेत्रांतर्गत आलेगाव-मेहकर रस्त्यालगत असलेल्या वन कर्मचाऱ्यांचे क्वॉर्टर व ...
पांढुर्णा: चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातूर तालुक्यातील आलेगाव वन परिक्षेत्रांतर्गत आलेगाव-मेहकर रस्त्यालगत असलेल्या वन कर्मचाऱ्यांचे क्वॉर्टर व विश्रामगृह, तसेच उमरवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत अज्ञात चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना दि. २४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामध्ये अज्ञात चोरट्यांनी वन विभागाचे काही दस्तावेज चोरीस गेल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.
वन विभागाच्या विश्रामगृहातील टीव्ही, बॅटरी, दस्तावेज आणि रबर स्टॅम्प चोरीला गेल्याची माहिती आहे. चोरट्यांनी कपाटामधील साहित्याची नासधूस केली आहे. तसेच येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत ही चोरी करीत दोन टीव्ही संच लंपास केला आहे. अंगणवाडीचे कुलूप तोडून सर्व साहित्याची नासधूस केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे.
------------------------------------------
पिंपळडोळी येथील वन विभागाच्या विश्रामगृहात व कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरमध्ये चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. पुढील सर्व तपास पोलीस करतील.
-विश्वनाथ चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी, आलेगाव ( प्रा).
---------------------------------------------
दोन्ही ठिकाणच्या चोरीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
- राहुल वाघ, ठाणेदार, चान्नी पोलीस स्टेशन.