अकोला जिल्ह्यातील तीन शाळांच्या व्यवस्थापनाला फौजदारी दणका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:21 PM2018-08-07T13:21:00+5:302018-08-07T13:23:10+5:30
अकोला : शासनाने सर्वच शाळांची एकाचवेळी केलेल्या पट पडताळणीत पटसंख्या बोगस असल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात तीन शाळांच्या अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापकांविरुध्द खदान व डाबकी रोड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
अकोला : शासनाने सर्वच शाळांची एकाचवेळी केलेल्या पट पडताळणीत पटसंख्या बोगस असल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात तीन शाळांच्या अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापकांविरुध्द खदान व डाबकी रोड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्यातील एकूण २२ शाळा व्यवस्थापनावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. यामध्ये डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुमेध मराठी प्राथमिक शाळेच्या अध्यक्षा विजया डोंगरे रा. बाजोरीया ले आउट हिंगना रोड व सचिव नीता देवीदास डोंगरे यांच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मिशन मराठी प्राथमिक शाळेचे अध्यक्ष विजय व्ही. हिवराळे रा. व प्रभारी मुख्याध्यापीका नीलमनी विजय हिवराळे रा. ख्रिश्चन कॉलनी तसेच व्हीएचबी कॉलनीतील मनोहर नाईक प्राथमिक शाळेचे अध्यक्ष नरेश बाबुसिंह नाईक रा. उमरी वाशिम व प्रभारी मुख्याध्यापीका वनीता शंकरराव देशमूख यांच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात एकाचवेळी ३ ते ५ आॅक्टोबर २०११ दरम्यान प्राथमिक शाळांमध्ये विशेष पट पडताळणी मोहीम राबवण्यात आली होती. मोहिमेदरम्यान ज्या शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत ५० टक्केपेक्षा कमी उपस्थिती होती. परंतु, अनेक शाळांमध्ये पदे वाचविण्याच्या दृष्टिकोनातून बोगस विद्यार्थी पटावर दाखवून वाढीव तुकडी मागणे, वाढीव तुकड्या दाखवून अतिरिक्त शिक्षकांची पदे मंजूर करून घेण्यात आली होती. तसेच या शाळांनी शासनाच्या शालेय पोषण आहार, गणवेश, लेखन साहित्य, पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका, उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्तीचा सुद्धा लाभ घेतला होता. शासनाची आर्थिक फसवणूक करून, खोटी कागदपत्रे बनवून ती खरी असल्याचे भासविल्याने या शाळा, मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर, अकोट गट शिक्षणाधिकाºयांनी पोलिसात दिलेल्या तक्रारींवरून सुरुवातीला खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार शाळांच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या शाळांना फौजदारी झटका!
डाबकी रोड पोलीस स्टेशन - सुमेध मराठी प्राथमिक शाळा, डाबकी रोड,
खदान पोलीस स्टेशन -मिशन मराठी प्राथमिक शाळा ख्रिश्चन कॉलनी, सानिया उर्दू प्राथमिक शाळा ख्रिश्चन कॉलनी, मनोहर नाईक प्राथमिक शाळा, व्हीएचबी कॉलनी.