विद्यार्थ्यांअभावी तीन शाळा बंद; इमारती ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:37 PM2019-09-23T12:37:05+5:302019-09-23T12:37:11+5:30
शून्य पट असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लसणापूर, जिल्हा परिषद उर्दू शाळा जामठी बु. या दोन शाळांचा समावेश.
- संजय उमक
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: सक्तीचे मोफत शिक्षण असतानाही विद्यार्थी इंग्रजी शाळांकडे वळत असल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा अनेक ठिकाणी बंद पडल्या आहेत. काही ठिकाणी केवळ १-२ विद्यार्थी पटावर आहेत. अनेक ठिकाणच्या शाळा बंद पडल्याने इमारती मात्र ओस पडल्या आहेत.
मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १४२ शाळा आहेत. तालुक्यात १४२ शाळांपैकी ८२ शाळा दोन शिक्षकी आहेत. यातील दोन शिक्षकी शाळांमधली पटसंख्या रोडावली आहे. काही शाळांमध्ये शून्य पटसंख्या असल्याने त्या बंद पडल्या आहेत, तर काही शाळांमध्ये एकाच विद्यार्थ्यासाठी शाळा सुरू ठेवण्यात आली असून, तेथे दोन शिक्षक कार्यरत आहेत. ८२ शाळांमध्ये शून्य पट असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लसणापूर, जिल्हा परिषद उर्दू शाळा जामठी बु. या दोन शाळांचा समावेश असून, एंडली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा वर्ग १ ते ४ पटसंख्येअभावी गत दोन वर्षांपूर्वीच बंद पडली आहे. आरखेड, कुरुम रेल्वे स्टेशन, शिराळा इथल्या शाळेत केवळ एक-एक विद्यार्थी असून, तेथे मात्र दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासन नियमाप्रमाणे १ ते २० पटसंख्या असलेल्या ठिकाणी संच मान्यतेनुसार दोन शिक्षकांची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. असे शासकीय धोरण असल्याने १ ते २० पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत.
- स्मिता घावडे, गटशिक्षणाधिकारी, पं. स. मूर्तिजापूर