हैदराबाद-जयपूरसह तीन विशेष रेल्वेंना मुदतवाढीची प्रतीक्षा; सप्टेंबरअखेर संपणार मुदत
By Atul.jaiswal | Published: September 25, 2023 01:26 PM2023-09-25T13:26:07+5:302023-09-25T13:26:19+5:30
सणासुदीत होणार प्रवाशांची अडचण
अकोला : सुरु झाल्यानंतर अल्पावधितच लोकप्रिय ठरलेल्या हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर व ओखा-मुदुरै या तीन उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत संपत आहे. अकोला मार्गे असलेल्या या गाड्यांच्या आता केवळ एक-एक फेऱ्या शिल्लक असल्या तरी अद्यापपर्यंत दक्षीण मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेकडून मुदतवाढ देण्यात आली नाही. या गाड्यांना मुदतवाढ न मिळाल्यास दसरा, दिवाळी व नाताळाच्या सुट्यांमध्ये प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेने पश्चिमेकडील ओखा व्दारका, सोमनाथ यांना दक्षिण भारतातील नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा, हैदराबाद या शहरांना जोडण्यासाठी काचीगुडा - बिकानेर, ओखा - मदुरै, हैदराबाद - जयपुर विशेष, राजकोट ते महबूबनगर (तेलंगणा) दरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वे सुरु केल्या होत्या. पहिल्या फेरीपासूनच या रेल्वेचे आरक्षण फुल्ल होते. मात्र रेल्वेने प्रचंड पाठिंबा मिळूनही रेल्वेनेकडून अद्याप या विशेष गाडीचा अवधी वाढवण्यात आला नाही. रेल्वे बंद झाल्यास हजारो व्यापारी, भाविक आणि प्रवाशांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही ट्रेन मुदतवाढ देऊन कायमस्वरूपी करण्याची मागणी व्यापारी आणि लाखो हिंदू भाविकांनी केली आहे.
ट्रेन कायमस्वरूपी केल्याने ट्रेन उशिराने धावण्याला आळा बसेल, तिकिटाचे दरही कमी होतील, त्यामुळे व्यापारी आणि भाविकांना फायदा होईल. रेल्वेने या गाड्यांना मुदतवाढ देण्याची मागणी डीआरयूसीसी सदस्य राकेश भट्ट, वाशिमचे महेंद्रसिंग गुलाटी, अकोल्याचे ॲड. ठाकूर, ॲड. अमोल इंगळे, हिंगोलीचे प्रवीण पडघन, शोऐब वासेसा, शे.रियाज, शेगांवचे शेखर नागपाल, ॲड. पुरुषोत्तम डागरा यांनी केली आहे.
आता उरली केवळ शेवटची फेरी
रेल्वे : दिनांक
०७०५४ बीकानेर - काचीगुडा : ३०.०९.२०२३
०७०५३ काचीगुडा - बिकानेर : ०३.१०.२०२३
०९५२० ओखा - मदुरै : २५.०९.२०२३
०९५१९ मदुरै - ओखा : २९.०९.२०२३
०७११५ हैदराबाद - जयपुर : २९.०९.२०२३
०७११६ जयपुर - हैद्राबाद : ०१.१०.२०२३
०९५७५/७६ राजकोट महबूबनगर : (ऑगस्ट नंतर मुदतवाढ नाही.)