महिनाभरात तीन हजारांवर जात, क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:00 PM2018-06-25T14:00:34+5:302018-06-25T14:07:09+5:30
अकोला : जिल्ह्यातील तीन तालुक्यांत गत महिनाभरात ३ हजार २६२ जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये अकोला, बाळापूर व पातूर तालुक्यातील प्रकरणांचा समावेश आहे.
अकोला : जिल्ह्यातील तीन तालुक्यांत गत महिनाभरात ३ हजार २६२ जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये अकोला, बाळापूर व पातूर तालुक्यातील प्रकरणांचा समावेश आहे.
इयत्ता बारावी व दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, शैक्षणिक कामांसाठी जात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. त्यानुषंगाने अकोला व बाळापूर उप विभागांतर्गत अकोला, बाळापूर व पातूर या तालुक्यात जात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी सेतू केंद्रांमध्ये प्रकरण दाखल झाल्यांनतर विद्यार्थ्यांना सात दिवसांत जात व क्रिमिलेअर प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे नियोजन संबंधित उप विभागीय अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले. त्यामध्ये २३ जूनपर्यंत गत महिनाभराच्या कालावधीत अकोला व बाळापूर उप विभागांतर्गत तीन तालुक्यात ३ हजार २६२ जात व क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये अकोला उप विभागांतर्गत १ हजार ७६० आणि बाळापूर उप विभागांतर्गत १ हजार ५०२ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, अशी माहिती अकोला व बाळापूरचे उप विभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिली.
जात पडताळणी झाल्यास जात प्रमाणपत्रासाठी पुरावे नको!
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या २४ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या अधिसूचनेनुसार रक्त संबंंधातील (वडील, भाऊ, काका) इत्यादी नातेवाईकांची जात पडताळणी झालेल्या अर्जदारांनी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेले पुरावे सादर करण्याची गरज नाही. अर्जासोबत मूळ रहिवासाची कागदपत्रे जोडल्यास जातीचे प्रमाणपत्र देण्यात येतील, असेही अकोला व बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.