सिंचन विहिरीसाठी तीन हजार शेतकऱ्यांना मिळणार पाच लाख!
By संतोष येलकर | Published: September 14, 2024 06:57 PM2024-09-14T18:57:07+5:302024-09-14T18:57:36+5:30
अनुदानाच्या रकमेत एक लाख रुपयांची वाढ; जिल्ह्यात विहिरींची कामे मंजूर
संतोष येलकर, अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी अनुदानाच्या रकमेत ५ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार एक लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात १२ सप्टेंबरपर्यंत मंजूर सिंचन विहिरींच्या कामांसाठी ३ हजार १३५ लाभार्थी शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन सुविधांसाठी शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी यापूर्वी प्रत्येकी चार लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत होते.
दरम्यान, बांधकाम विभागाच्या चालू दरसुचीनुसार आणि केंद्र शासनामार्फत १ एप्रिल २०२४ पासून ‘नरेगा ’ अंतर्गत लागू करण्यात आलेले प्रतिदिवस २९७ रुपये मजुरीचे दर विचारात घेता, राज्य शासनाच्या ५ ऑगस्ट रोजीच्या निर्णयानुसार सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी अनुदानाची रक्कम पाच लाख रुपये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार १ एप्रिल २०२४ पासून मंजुरी देण्यात आलेल्या; मात्र कामे सुरू न झालेल्या जिल्ह्यातील ३ हजार १३५ सिंचन विहिरींच्या बांधकामासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
तालुकानिहाय अशी आहेत सिंचन विहिरींची मंजूर कामे !
तालुका विहिरी
अकोला ११२
अकोट १३३
बाळापूर २८१
बार्शिटाकळी १२९९
मूर्तिजापूर ४८६
पातूर ६०७
तेल्हारा २१७